केंद्राकडे मागितले साडेतीन लाख, आले ३० हजार पीपीई कीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 02:34 AM2020-04-17T02:34:53+5:302020-04-17T02:35:47+5:30
प्लाज्मा, पूल टेस्टिंगच्या परवानगीची प्रतीक्षा
मुंबई : महाराष्ट्राची गरज लक्षात घेत केंद्र सरकारकडे साडेतीन लाख पीपीई किट आणि आठ लाख एन-९५ मास्कची मागणी राज्य सरकारने केली होती. मात्र त्यापैकी एक लाख मास्क आणि तीस हजार किट आतापर्यंत मिळाले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कोरोना तपासणीसाठी आवश्यक किट प्रत्येक वेळी नवीन लागतात. पूल टेस्टिंग, रॅपिड टेस्टिंग आणि प्लाज्मा तंत्राचा वापर होत आहे. यासंदर्भात राज्याने पूल टेस्टिंग आणि उपचारासाठी प्लाज्मा तंत्राच्या वापराची परवानगी द्यावी, अशी मागणी यापूर्वीच केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्राच्या आयसीएमआरकडून त्याची परवानगी अद्याप मिळालेली नसल्याचे टोपे यांनी या वेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या मृत्यू दर कमी करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आदर्श उपचार प्रणाली, झालेल्या मृत्यूचे पूर्ण आॅडिट तसेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने सल्ला, मार्गदर्शनासाठी या समित्या आणि टास्क फोर्स तयार करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. देशातील एकूण चाचण्यांपैकी वीस टक्के चाचण्या एकट्या महाराष्ट्रात घडल्या आहेत. चाचणी आणखी वाढविण्यात येणार आहेत. प्रत्येकी १५ सरकारी व खासगी ठिकाणी तपासणी सुरू आहे. यात आणखी सहा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत तपासणीची सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केले.
तबलिगींच्या विषयावर पडदा
दिल्लीतील मरकजमध्ये राज्यातून १४०० तबलिगी गेले होते. याबाबत गृहमंत्र्यांशी चर्चा करून माहिती घेतली. सर्व १४०० तबलिगींचे विलगीकरण करण्यात आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. त्यामुळे या विषयावर आता पडदा पडला आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.