मुंबई : शहरातील पाककृतींच्या इतिहासाचे जतन करण्यासाठी मुंबई वारसा संवर्धन समितीने मुंबईतील प्रतिष्ठित इराणी कॅफे, बेकरींना भेट देऊन त्यांना वारसा दर्जा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेने अलीकडेच दिलेल्या नोटिशींमुळे शहरातील शतकाहून अधिक काळ जुन्या बेकऱ्या बंद पडण्याच्या धोका असल्याने समितीने स्वतःहून दखल घ्यावी. या कॅफे, बेकऱ्यांच्या मालकांची सुनावणी घेण्याची आणि त्यांच्या इतिहासाच्या आणि ऐतिहासिक रचनेनुसार त्यांना वारसा दर्जा देण्याचा विचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक राहुल नार्वेकर यांनी समितीकडे एका पत्राद्वारे केली आहे.
दक्षिण मुंबईतील काही प्रतिष्ठित इराणी कॅफे आपल्या शहराच्या खाद्यसंस्कृती आणि इतिहासाचा आधारस्तंभ आहेत. हे कॅफे एका शतकाहून अधिक काळ अस्तित्वात आहेत आणि ते वापरत असलेले लाकडाच्या भट्ट्यांचे ओव्हन त्यांच्या वारशाचा अविभाज्य भाग आहेत. या कॅफे ज्या भाजलेल्या पदार्थांसाठी ओळखले जातात, त्यांची विशिष्ट चव लाकूड आणि कोळसा भट्टीच्या ओव्हनचा परिणाम आहे. लाकूडरहित ओव्हनमुळे ग्राहकांनी पिढ्यान् पिढ्या चाखलेल्या पाककृतीची चव बदलेल, असे नार्वेकर म्हणाले.'
इराणी स्थलांतरितांच्या पाककृती परंपराइराणी कॅफे वा बेकरी यांचे मूळ १९ व्या शतकात आहे. झोरास्ट्रियन इराणी स्थलांतरितांनी मुंबईत त्यांच्या पाककृती परंपरा आणल्या. कालांतराने, हे कॅफे शहराच्या वैश्विक ओळखीचे प्रतीक बनले. जिथे सर्व स्तरांतील लोक एकत्र येऊन गरम चहा, ताजे भाजलेले ब्रेड आणि विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील, अशी जागा उपलब्ध झाली. हे कॅफे शहराच्या आकर्षण आणि वैशिष्ट्यात योगदान देतात, असेही नार्वेकर म्हणाले.