शाहरुख खानलाही आरोपी करण्याची मागणी, कार्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी आणखी एक याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2023 12:02 PM2023-06-13T12:02:14+5:302023-06-13T12:02:44+5:30
मानवी अधिकार कार्यकर्ते रशीद खान पठाण यांनी फौजदारी जनहित याचिका केली दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कार्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी आता आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांना ५० लाख रुपयांची लाच दिल्याप्रकरणी शाहरुख खानवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार लाच घेणे व लाच देणे गुन्हा आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
मानवी अधिकार कार्यकर्ते रशीद खान पठाण यांनी ही फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची अपेक्षा आहे. सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, ड्रग्स प्रकरणातून आर्यनला वाचविण्यासाठी शाहरुखने समीर वानखेडे यांना ५० लाख रुपये लाच दिली. त्यामुळे शाहरुख खानसह त्याचा मुलगा आर्यन खानलाही आरोपी करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आर्यन खानला सोडविण्यासाठी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटी रुपये मागितले. अखेरीस १८ कोटी रुपये देण्याचे ठरले. आगाऊ रक्कम म्हणून ५० लाख रुपये वनखेडेंच्या वतीने किरण गोसावीला देण्यात आले.
लवकरच सुनावणीची शक्यता
- याचिकेनुसार, संबंधित लाच प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी तपास केला.
- मात्र, त्यांनी समीर वानखेडेला क्लीनचिट दिली. त्यामुळे वानखेडे यांना क्लीनचिट देणाऱ्या मुंबई पोलिसांचीही चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला द्यावेत, अशी मागणी पठाण यांनी याचिकेद्वारे केली आहे.
- या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.