Join us  

वसई-मडगाव मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवली सिंधू एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी

By सचिन लुंगसे | Published: May 17, 2024 6:25 PM

पर्यटकांसह सणासुदीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवासी आकडा वाढत आहे.

मुंबई : कोकण पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित होत असून, कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसह सणासुदीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवासी आकडा वाढत आहे. यावर उपाय म्हणून अतिरिक्त रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली जात असली तरी ती तोकडी पडत आहे. परिणामी यावर उपाय म्हणून वसई-मडगाव (अप आणि डाऊन) मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवली येथे सिंधू एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याची आणि नियमित करण्याची निकड असल्याचे सिधुंदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाचे अध्यक्ष भरत नाईक यांनी सांगितले.

सिधुंदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाकडून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार, वसई-मडगाव (अप आणि डाऊन) मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवलीवर सिंधू एक्स्प्रेस ट्रेन नियमित करण्यात यावी, असे नमुद करण्यात आले आहे. मुळात कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. मुंबई शहर ते मडगाव दरम्यान हजारो प्रवासी नियमितपणे प्रवास करतात. या ठिकाणी जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावरून नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे. तथापि, गौरी-गणपती, होळी, आंगणेवाडी जत्रा (कोकण क्षेत्रातील प्रमुख सण) आणि उन्हाळी सुटटयांमध्ये सणासुदीच्या काळात रेल्वेवरील मार्गावर अतिरिक्त गाड्यांची  सोय करते. मात्र या मार्गावर नियमित ट्रेन नसल्याने पश्चिम उपनगरातील वांद्रे-विरार मार्गावरील प्रवाशांना गैरसोय आणि त्रास सहन करावा लागतो.

सध्या, कोकण विभागातील लाखो कुटुंबे मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहतात. पर्यटन, तीर्थयात्रा, सण, व्यवसाय इत्यादी विविध कारणांसाठी त्यांच्या कुटुंबियांसह ये-जा करतात. याकरिता वसई-मडगाव (अप आणि डाऊन) मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवली येथे सिंधू एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याची आणि नियमित करण्याची निकड आहे, अशी मागणी मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात सवलत मिळत नाही, परिणामी त्यांना याचा भुर्दंड सहन करावा लागतो, याकडेही मंडळाने लक्ष वेधत सवलत देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :मुंबईरेल्वे