भाव वाढूनही मागणी जैसे थे
By admin | Published: August 5, 2015 01:13 AM2015-08-05T01:13:59+5:302015-08-05T01:13:59+5:30
कांद्याचे दर गगनाला भिडले असतानाही कांद्याच्या मागणीत मात्र घट झालेली नाही. मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिक रोज ८०० टन कांदा फस्त करत आहेत
नामदेव मोरे, नवी मुंबई
कांद्याचे दर गगनाला भिडले असतानाही कांद्याच्या मागणीत मात्र घट झालेली नाही. मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिक रोज ८०० टन कांदा फस्त करत आहेत. मुंबईकरांच्या आहाराचा अविभाज्य भाग असल्यामुळेच त्याची गणना आता जीवनावश्यक वस्तूंमध्ये केली जात आहे.
मुंबई बाजार समितीच्या होलसेल मार्केटमध्ये कांदा ३१ ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ५० रुपयांवर गेले आहेत. पुढील दोन महिन्यांत बाजारभाव आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही मुंबई व नवी मुंबईमध्ये रोज सरासरी ८०० टन कांद्याचा खप होत आहे. काही वेळा ९०० टनचा टप्पाही ओलांडला जातो. भाव कितीही वाढले तरी त्यामध्ये फारसा परिणाम होत नाही. घरातील भाजी असो किंवा हॉटेलमधील पावभाजी कांदा लागतोच. त्यामुळेच भाव कितीही वाढले तरी मागणी कमी होत नाही.
भाववाढ झाली की पाकिस्तानपासून चीनपर्यंतचा कांदा या मार्केटमध्ये येतो. मुंबईकरांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी जिथून उपलब्ध होईल तेथून माल खरेदी करत असल्याचे चित्र दिसते. परंतु राज्यात सर्वत्र कांदा टंचाई सुरू असल्यामुळे पुढील दोन ते तीन महिने पुरेशी आवक होणार का याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.