पोलीस भरती होण्यासाठी ७ लाखाची मागणी करणारा पोलिसांच्या जाळ्यात
By निखिल म्हात्रे | Published: April 2, 2023 09:14 PM2023-04-02T21:14:32+5:302023-04-02T21:14:45+5:30
गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक बावर, रोहा पोलीस ठाणे हे करीत आहेत.
अलिबाग - रायगड पोलीस दलामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून ७ लाख रुपयांची मागणी करीत एक लाख रुपयांची आगाऊ रक्कम घेणाऱ्या विरोधात रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा येथे आरोपी पी. बी मोकलने एकास त्यांच्या मुलाला रायगड पोलीस दलामध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून ७ लाख रुपये मागणी केली होती. फिर्यादीने पैसे देण्यास मान्य केले होते. त्यानंतर फिर्यादीचा भाऊ, पुतण्या आणि मुलगा हे आरोपीत याला भेटण्यासाठी पेण येथे गेले असता आरोपी याने यापूर्वी मागणी केलेले ७ लाख रुपयापैकी १ लाख रूपये तक्रारदाराच्या भावा कडून अप्रमाणिकपणे स्विकारून फसवणूक केले बाबत रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे.
गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक बावर, रोहा पोलीस ठाणे हे करीत आहेत. आरोपीत पी. बी. मोकल यास तात्काळ अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.असून आरोपीस पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे.रायगड जिल्हा पोलीस भरती सुरू असून भरती ती अधिक पारदर्शकपणे पार पाडली जाईल याची पूर्ण दक्षता रायगड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्फत घेण्यात येत आहे.
पोलिस भरतीत कोणताही गैरप्रकार होत नाही, हे सत्य उमेदवारांनी लक्षात घ्यावे. कुणालाही लाच म्हणून पैसे देणे किंवा अन्य गैरमार्गांचा वापर करणे अयोग्य आहे. परिश्रम आणि अभ्यास हेच यशासाठी आवश्यक असतात, असे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उमेदवारांना सांगितले आहे. कुणी फसवणूक करीत असल्यास पोलिसांशी थेट संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की, सदरची पोलीस भरती प्रक्रिया ही निपक्षपातीपणे पार पडत अमुन कोणत्याही गैरप्रकाराला यामध्ये पारा असणार नाही. कोणतीही व्यक्ती आमिष दाखवून पैशांची मागणी करीत असल्यास किंवा आर्थिक गैरव्यवहाराचा संशय आल्यास तात्काळ पोलीस अधिक्षक कार्यालय दुरध्वनी क्रमांक या ०२१४१-२२८४७३, २२२०२८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.