Join us

तृतीयपंथीकडे सेक्सची मागणी करणे बेतले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:06 AM

मुंबई : तृतीयपंथीकडे सेक्सची मागणी करणे तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना बैगनवाडी परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ६ ...

मुंबई : तृतीयपंथीकडे सेक्सची मागणी करणे तरुणाच्या जिवावर बेतल्याची घटना बैगनवाडी परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेत कारवाई केली आहे.

बैगनवाडी येथे गुरुवारी सकाळी एकजण कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली जखमी अवस्थेत मिळून आल्याची माहिती मिळताच, त्याला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तपासात तो मृतदेह सुहेल अहमद नूर मोहम्मद शाह (वय ३६) या तरुणाचा असल्याचे समजले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर गायके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सुहेल हा त्याचा मित्र समदसोबत बैगनवाडी परिसरात दारू पित बसल्याचे समोर आले. यावेळी समदने शहनाज या महिलेस कॉल करून बोलावून घेतले. अशात शहनाज ही तिच्यासोबत तृतीयपंथी कलिम ऊर्फ कायनाथलाही घेऊन आली. यावेळी सुहेलने कलिमसोबत जवळीक साधून मोबाईल क्रमांक मिळविला.

शहनाज आणि कायनाथ तेथून निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने सुहेलने कायनाथला कॉल करून सेक्सची मागणी केली. अशात ही बाब शहनाजला समजताच ती तिच्या मुलगा, मुलगी, पती आणि कायनाथसोबत तेथे धडकली. यावेळी सुहेलसोबत त्यांचा वाद घातला. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने जवळील चाकूने पोटात वार केले, तर शहनाज यांच्या मुलाने त्याला पट्टयाने मारहाण केली. या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी १६ वर्षीय तरुणासह मोहम्मद शकील इद्रीस शेख ऊर्फ आसू (वय २९), समीर असाब अली खान (२०), आफ्रेन मोहम्मद सुलेमान शेख (२३),

शेहनाज अन्वर हुसेन शेख (४०), तृतीयपंथी कलिम ऊर्फ कायनाथ शब्बीर अन्सारी (१९) यांना ताब्यात घेतले. यापैकी पाचजणांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन तरुणाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे, तर मोहम्मद यासीन मोईन खान ऊर्फ इरफान ऊर्फ घोडा (२६) याचा शोध सुरू आहे.