मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार, अशी विचारणा करण्यापूर्वी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यांच्या खर्चाचा तपशील जनतेला द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.भाजपने राज ठाकरे यांच्या सभांचा खर्च कोणाच्या खात्यात टाकणार, अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र, मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मणिपूर अशा विविध राज्यांचा दौरा केला. याबद्दलचे स्पष्टीकरण तावडे देऊ शकतील का, अशी विचारणा किल्लेदार यांनी केली. राज भाषणाच्या प्रभावाने भाजपच्या मतांवर परिणाम होईल, या भीतिपोटी तावडे यांनी तथ्य नसतानाही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मात्र, याचा काडीमात्र फायदा होणार नाही. जाहीर सभा घेऊन पंतप्रधानांबद्दल मत मांडण्याचा अधिकार त्यांना नाही का, असा सवालही किल्लेदार यांनी केला आहे. राज यांच्या सभेच्या खर्चाची चर्चा करणे म्हणजे राज ठाकरे यांचा दराराच म्हणावा लागेल, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या सभेचा खर्च मांडण्याची मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 5:45 AM