Join us  

टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य

By admin | Published: June 19, 2014 2:18 AM

टीबी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ३९ मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता रुग्णालयामध्ये आंदोलन केले होते

मुंबई : टीबी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ३९ मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ११ वाजता रुग्णालयामध्ये आंदोलन केले होते. प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दुपारी ३ वाजता कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. गेल्या चार वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गणवेश देण्यात आलेला नव्हता. गणवेशाची त्यांची प्रमुख मागणी मान्य झाली आहे. २०१४ ते २०१६ या दोन वर्षांसाठी त्यांना गणवेश देण्यात येणार आहेत. मागील चार वर्षांच्या दोन गणवेशांचे पैसेदेखील त्यांना देण्यात येणार आहेत. बॉयलर चालवण्यासाठी प्रशिक्षित व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे, सध्याच्या स्वयंपाकघराच्या स्थितीची पाहणी महापालिकेच्या उपकार्यकारी अधिकारी डॉ. श्रीधर कुबल यांनी तत्काळ सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती म्युनिसिपल मजूदर युनियनच्या सचिव प्रदीप नारकर यांनी दिली. एमडीआर टीबी झालेल्या कर्मचाऱ्यांना औषध मिळत नाही, असे यापुढे होणार नाही. कर्मचाऱ्यांच्या औषधासाठी अधिकचे पैसे देण्यात येतील, या काही मागण्या पुढच्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता देण्यात येईल, प्रथिनेयुक्त आहार देण्यात येईल, प्रत्येक कर्मचाऱ्याने एन ९५ मास्क पुरवण्यात येतील, हे मास्क एकदा वापरून टाकून देण्यात यावे, असेही सांगितले आहे.एखाद्या कर्मचाऱ्याला एमडीआर टीबी झाला, त्यानंतर त्याला पुन्हा टीबीची लागण होऊ नये म्हणून रुग्णांच्या संपर्कात येणार नाही, अशा ठिकाणी काम देण्यात येईल. परिचारिकांची भरती करण्यात येईल. एक्स-रे आणि लॅबमधील रिक्त पदे भरण्यात येतील, याचेही आश्वासन डॉ. कुबल यांनी दिले आहे. (प्रतिनिधी)