Join us

मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 4:07 AM

आदित्य ठाकरे, मुंबई शहर आणि उपनगरातील बैठक संपन्नलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या ...

आदित्य ठाकरे, मुंबई शहर आणि उपनगरातील बैठक संपन्न

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय व बदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना यावेळी आदित्य ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी करावयाची प्रक्रिया जलद पूर्ण करण्यात यावी. यासंदर्भात लवकरच पुन्हा आढावा बैठक घेऊन कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

शहरचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, कोळीवाडे, आदिवासी पाडे किंवा गावठाणाचा भाग लगत आहे तिथे कोळीवाड्याचे सीमांकन करणे गरजेचे आहे. मुंबईतील बहुतांश कोळीवाड्यांचे सीमांकन झाले असून, उर्वरित कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लवकर सर्वेक्षण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.