पंडित जसराज यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले - बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 09:28 PM2020-08-17T21:28:17+5:302020-08-17T21:29:19+5:30
शास्त्रीय संगीतातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
मुंबई : ख्यातनाम शास्त्रीय गायक व संगीतकार पद्मविभूषण पंडित जसराज यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीताचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील एक पर्व संपले आहे, अशा शोकभावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.
पंडितजी मेवाती घराण्याशी संबंधीत होते. सुरुवातीला त्यांनी वडिलांकडून संगीताचे धडे गिरवले व त्यानंतर भावाने त्यांना प्रशिक्षण दिले. ८० वर्षांहून अधिक काळ ते संगीत क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या संगीताने त्यांनी लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात त्यांनी शास्त्रीय संगीताची वेगळी छाप सोडली. पंडित जसराज यांचे भारत, अमेरिकेसह जगभरात अनेक शिष्य आहेत. पंडितजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
शास्त्रीय संगीतातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन काँग्रेस पक्ष पंडित जसराज यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
निशिकांत कामतच्या निधनाने एक उमदा दिग्दर्शक हरपला - बाळासाहेब थोरात
'डोंबिवली फास्ट', 'लय भारी', दृश्यम, मदारी, अशा दर्जेदार सिनेमांचा मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामतच्या अकाली निधनाचे वृत्त मनाला चटका लावून गेले. अवघ्या ५० व्या वर्षी कामत यांनी जगाचा निरोप घेतला हे अजूनही मनाला पटत नाही. दर्जेदार चित्रपट देणाऱ्या निशिकांत कामतच्या जाण्याने चित्रपसृष्टीने एक उमदा दिग्दर्शक गमावला आहे, अशा शोकभावना बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल्या आहेत.