प्रणवदांच्या निधनाने एका पर्वाचा अंत- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:53 AM2020-09-08T01:53:02+5:302020-09-08T01:53:09+5:30
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे सत्तेचा हव्यास नसलेले नेते
मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका पर्वाचा अंत झाला, सर्व पक्षांमध्ये स्रेहपूर्ण संबंध असलेला विद्वान नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशा शब्दांत प्रणवदांना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सोमवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निधनाने सत्तेचा विकार नसलेला काँग्रेसनिष्ठ नेता हरपला या शब्दात श्रद्धांजली वाहण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत शोकप्रस्ताव मांडला. भारतरत्न प्रणव मुखर्जी, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अनिल राठोड, सुधाकरपंत परिचारक, हरीभाऊ जावळे, सदाशिवराव ठाकरे, रामकृष्णबाबा पाटील, शीतलदास हरचंदानी, सुनील शिंदे, श्यामराव भीमराव पाटील, अण्णासाहेब उधाण, रामरतनबापू राऊत, सुरेश पाटील, मधुकर कांबळे आणि चंद्रकांता गोयल या विधानसभेच्या दिवंगत माजी सदस्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांबरोबरच उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ बागडे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली.
मुख्यमंत्र्यांचे भाजपला चिमटे
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रणवदांना पाठिंबा दिला होता. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपण्याच्या काही दिवस आधी ते मुंबईत आले तेव्हा त्यांनी मला राजभवनवर भेटीसाठी बोलावून घेतले आणि बाळासाहेबांमुळे मी राष्ट्रपती होऊ शकलो, अशी भावना व्यक्त केली. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. नाहीतर काहीजण रात गयी बात गयी, खुर्ची मिळाली की विचारत नाहीत, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी भाजपला काढला.
विधान परिषदेत श्रद्धांजली
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी सदस्य विजय मुडे, रामनाथ मोते, बलभीमराव देशमुख, युनुस शेख, जयवंतराव ठाकरे या दिवंगत मान्यवरांना विधान परिषदेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींची श्रद्धांजलीपर भाषणे झाली.