Join us

देशात लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात; शिवसेना नेते संजय राऊतांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 11:10 AM

फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत तिथं हा पॅटर्न राबवला जात आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

मुंबई – महाराष्ट्रात माझा आणि एकनाथ खडसेंचा फोन टॅप केला जात होता. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हे केले आणि ते कुणासाठी केले हे सगळ्यांना माहिती आहे. आता या प्रकरणी कुलाबा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतरही काय चाललंय हे माहिती व्हावं यासाठी माझा फोन टॅप केला जात होता. गोव्यात सुदिन ढवळीकर यांचाही फोन टॅप केला जात असल्याची माहिती मीच त्यांना दिल्याचं विधान शिवसेना नेते संजय राऊत(Shivsena Sanjay Raut) यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला, ते म्हणाले की, फोन टॅपिंगचा हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. ज्या राज्यात निवडणुका आहेत तिथं हा पॅटर्न राबवला जात आहे. महाराष्ट्रात पॅटर्नचे प्रमुख आता गोव्यात निवडणुकीचे प्रमुख आहे. गोव्यात भाजपा येणार नाही हे मी सुरुवातीपासून सांगतोय. विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅपिंग होत आहेत.  देश धर्म रक्षणासाठी आणखी काही करता येईल. पण आता देशातील लोकशाहीच धोक्यात आली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे असं सांगत राऊतांनी भाजपावर आणि देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.

तसेच विधानसभेचं काम होऊ दिलं नाही, हे विरोधी पक्षनेत्यांनी केलं. राज्यपाल हटवले पाहिजेत हे महाराष्ट्राचे म्हणणं आहे. घटनात्मक पदांवर अशी राजकीय व्यक्ती बसवली की असं होतं. राज्यपाल भाजपा प्रदेशाध्यक्ष असल्यासारखं काम करतायेत. ते घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीला न शोभणारं आहे. केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यपाल, फोन टॅपिंग या माध्यमातून एखाद्या राज्यात सत्ता आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात जे सुरू होते ते इतर राज्यात सुरु झाले. गोव्यातही त्रिशंकु सरकार येईल. भाजपाला यश मिळणार नाही. माझे फोन आजही टॅप होतायेत. परंतु मी माझा नंबर बदललेला नाही असंही संजय राऊत यांनी सांगितले आहे.

...तर तुमच्यावर जनता विश्वास ठेवणार नाही

मुंबईत अजिबात दहशतवाद नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आल्यापासून असं कुठलंही वातावरण नाही. दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातील जनता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. अधिवेशनाचं कामकाज होऊ दिलं जात नाही त्याला विरोधी पक्ष जबाबदार आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत. परंतु सरकारला काम करू द्यायचं नाही हे विरोधी पक्षाचं काम आहे. परंतु हे सगळं जनता पाहतेय असा टोलाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीसभाजपा