Join us

ब्रिटिश राजवटीतून लोकशाहीकडे

By admin | Published: January 14, 2017 7:22 AM

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष असते. या जागतिक दर्जाच्या शहराच्या महापालिकेचा

मुंबई : आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील घडामोडींवर संपूर्ण देशाचे लक्ष असते. या जागतिक दर्जाच्या शहराच्या महापालिकेचा अर्थसंकल्पही एखाद्या छोट्या राज्याच्या अर्थसंकल्पाहून मोठा असतो. पायाभूत व नागरी सुविधा, प्राथमिक शिक्षण, आरोग्य अशी जबाबदारी असलेली मुंबई महापालिका आता हायटेक व स्मार्ट होत आहे. झपाट्याने बदलत असलेल्या या शहराच्या २० वर्षांच्या विकासाचे नियोजनही आगाऊ केले जाते. अशा या महापालिकेच्या इतिहासाचा हा आढावा... ब्रिटिश साम्राज्याच्या उदयापासून अस्तापर्यंत मुंबईचे नगरापासून जागतिक कीर्तीच्या महानगरात रूपांतर झाले. पुढे मुंबई जसजशी वाढत गेली तसतसे शहराच्या कारभारासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज निर्माण होऊ लागली. त्यातच १८०३ मध्ये मोठी आग लागून या शहराचा काही भाग बेचिराख झाला. त्यामुळे १८०७ ते १८३० या कालावधीत अनेक वैधानिक उपाययोजना अमलात आणल्या गेल्या. पहिली उपाययोजना म्हणजे दोन मॅजिस्ट्रेट्स आणि एक जस्टीस आॅफ पीस मिळून १८०७ मध्ये ‘कोर्ट आॅफ पेटी सेशन्स’ची स्थापना झाली. त्यानंतर १८४५ मध्ये नागरी सप्तप्रधान मंडळाची स्थापना झाली. १८५८ मध्ये त्रिसदस्य आयुक्त मंडळाची स्थापना झाली, तर १८६५ मध्ये एक महापालिका आणि जस्टीस आॅफ पीस यांचे मंडळ तयार करण्यात आले. १८७२ मध्ये ६४ सदस्य असलेल्या मुंबई महापालिकेची रीतसर स्थापना झाली व मुंबईकरांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यानंतर लोकशाहीवर आधारित असलेल्या महापालिकेची पहिली बैठक ४ सप्टेंबर १८७३ रोजी झाली. (प्रतिनिधी)