लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य सरकारने अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याकरता केवळ एजन्सीची नियुक्ती केलेली आहे. भाड्याने कोणत्या कंपनीचे हेलिकॉप्टर घ्यायचे याचा कुठलाही उल्लेख जीआरमध्ये नसताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे नैराश्यातून बिनबुडाचे आरोप करीत असल्याची टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज केली. आॅगस्टा वेस्टलँडचे भूत काँग्रेसच्या मानगुटीवरून काही केल्या जात नाही हेच या आरोपांद्वारे सिद्ध होते, असे ते म्हणाले. राज्य सरकारने ई-टेंडरच्या माध्यमातून ज्या अॅडोनिस आणि अॅलॉफ्ट या दोन संस्थांची नेमणूक केली त्यांचा आॅगस्टा वेस्टलँडशी काहीही संबंध नाही. सुरक्षेसाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकरता दुहेरी इंजिन असलेले हेलिकॉप्टर वापरण्याचा नियम आहे. दुहेरी इंजिनच्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आणि नियुक्त एजन्सीने कोणत्या कंपनीचे हेलिकॉप्टर वापरायचे या बाबत कोणतेही बंधन नाही, असे भंडारी यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘आॅगस्टा’चे भूत काँग्रेसच्या मानगुटीवर : भाजपाची टीका
By admin | Published: May 10, 2017 1:46 AM