मुंबई - शिखर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र नोटीस नसतानाही शरद पवार ईडी कार्यालयात स्वत:हून हजर राहणार आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. देशात लोकशाही राहिली की नाही? हा प्रश्नच आहे. आचारसंहिता लागल्यानंतर लगेच कारवाई कशी? ईडी कारवाई करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना आहे. नाव नसताना शरद पवारांवर गुन्हा कसा नोंद झाला? भाजपाच्या डोक्यात सत्तेची मस्ती आलेली आहे. आमच्या कारवाई का केली याबाबत विचारणा करण्याचा आम्हाला अधिकार आहे. कार्यकर्त्यांची धरपकड करुन दबावतंत्राचा वापर केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी ईडी आणि पोलिसांची आहे असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच कायदा हातात न घेता मुस्कटदाबी होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस कधीही सहन करणार नाही. देशातील लोकशाही संकटात आहे. शरद पवारांकडूनही कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. असं असताना पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पकडण्यात येत आहे असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सांगितले आहे की, महाराष्ट्रात कुठेही शरद पवार गेले तरी लाखो लोकं त्यांचे स्वागत करत आहे. त्यातून ही कारवाई केली. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही. राष्ट्रवादी शिस्तबद्ध पक्ष आहे, कोणताही गोंधळ न करता निषेध नोंदवावा, महाराष्ट्रभर लोकांमध्ये संतापाची भावना आहे. लाखो कार्यकर्ते मुंबईत येण्याचा प्रयत्न करतायेत. कार्यकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावं, कुठेही गोंधळ करु नये असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
आज ईडी कार्यालयात शरद पवार स्वत:हून हजर राहणार असून कर नाही तर डर कशाला, अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षिण मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांना विनाकारण आरोप करुन नाव बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. पवारांना जो प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे सुडाचं राजकारण सुरु आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.