मंगल प्रभात लोढा यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील जिन्ना हाऊस अधिग्रहित करून तिथे सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील जिन्ना हाऊसच्या जागेवर सांस्कृतिक केंद्र उभारण्याच्या मागणीसाठी लोढा यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मोहम्मद अली जिन्ना यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात याच जिन्ना हाऊसमधून भारताच्या फाळणीचे षडयंत्र रचले होते. स्वातंत्र्यापासून ही इमारत पडिक पडली आहे. ही वास्तू उध्वस्त करून या ठिकाणी दक्षिण आशियायी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी लोढा यांनी केली. स्वातंत्र्यापूर्वी भारताचे तीन तुकडे करण्याचे कारस्थान याच जिन्ना हाऊसमध्ये रचले गेले. ही वास्तू फाळणीच्या कटू आठवणी जागविणारी आहे. २०१७ साली संसदेत शत्रू संपत्ती अधिनियमात सुधारणा करण्यात आली. या सुधारणेनुसार फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेलेल्यांच्या मालमत्तेवरील त्यांच्या वारसांचा हक्क संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता ही वास्तू नष्ट करण्यात कोणतीच अडचण नाही. लवकरच देशभरात ९ हजार २८० शत्रू संपत्तीचा लिलाव होणारच असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जिन्ना हाऊस पाडून तिथे सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी लोढा यांनी अमित शहा यांच्याकडे केली आहे.
यापूर्वी लोढा यांनी राज्य विधिमंडळातही जिन्ना हाऊस पाडून सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी केली होती. २०१७च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जिन्ना हाऊसच्या देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. ते थांबवून जिन्ना हाऊसच्या जागी सांस्कृतिक केंद्राची संकल्पना लोढा यांनी मांडली होती.