Join us

भर पावसात मालाड, मालवणी-अंबोजवाडीमध्ये २५० घरांवर तोडक कारवाई; आमदार अस्लम शेख आक्रमक 

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 21, 2023 18:06 IST

मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे.

मुंबई: मुंबईसह ७ जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात रायगड, खालापूर येथील इर्शारवाडीसारखी दुर्देवी घटना घडलेली असताना मालाड (पश्चिम) मालवणी, अंबोजवाडीमध्ये  भर पावसात गेली दोन तोडक कारवाई करत २५० पेक्षा जास्त बांधकामं तोडली गेली. यामुळे येथील नागरिक बेघर झाले असून भर पावसात तोडक कारवाई केल्यानंतर पावसात भिजल्याने दोन मुलं आज रुग्णालयात जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत.

अस्लम शेख म्हणाले की, पावसाळ्यात कोणाचीही घरे तोडू नयेत असे  उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. महाराष्ट्र सरकारचाही स्वत:चा असा शासन आदेश आहे. असे असताना असं अचानक नेमकं काय घडलं की प्रशासनावर  भर पावसात  घरे तोडण्याची वेळ आली. 

पोलीस प्रशासन, महानगरपालिका किंवा जिल्हाधिकारी असो सर्व यंत्रणांना उच्च न्यायालयाचा व सरकारचा आदेश लागू होतो. त्यामुळे भर पावसात घरे तोडणाऱ्या या अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका आज त्यांनी विधानसभेत घेतली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसाळ्यात कधीच अशा प्रकारची तोडक कारवाई केली जात नाही. अशा प्रकारची तोडक कारवाई का झाली याबाबत माहिती घेऊन संबंधितांना योग्य त्या सूचना देण्याची ग्वाही त्यांनी दिल्याचे शेख यांनी लोकमतला सांगितले. 

टॅग्स :मुंबईपाऊस