Join us

सायन पुलाचे पाडकाम लवकरच, वाहतुकीचे नियोजन सुरू; काही ठिकाणचे मार्ग 'नो-पार्किंग झोन'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:47 PM

मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी, पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी पूल लवकरच बंद करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:

मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या सायन उड्डाणपुलाची पुनर्बांधणी, पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी पूल लवकरच बंद करण्यात येणार आहे. पुढील आठवडाभरात होणाऱ्या सायन रोड पुलाच्या पाडकामाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची तयारी सुरू झाली आहे. मुख्यतः पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा महत्त्वाचा सायन पूल बंद केल्यास वाहतूक कोंडी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी तयारी सुरू केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तयारीच्या पहिल्या टप्प्यात सायन उड्डाणपूल बंद झाल्यामुळे वाहनांची गर्दी वाढणाऱ्या मार्गांवर शक्य तितक्या जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, सुलोचना शेट्टी मार्ग आणि चुनाभट्टी-बीकेसी कनेक्टरचा समावेश आहे.  तसेच माहीम, माटुंगा, चुनाभट्टी, बीकेसी, चेंबूर इत्यादींसह या मार्गांवर अनेक वाहतूक विभाग येतात आणि सर्व विभागांना  प्रत्येकी किमान ५० ते ६० ट्रॅफिक वॉर्डन मिळणार आहेत.  बांधकाम पाडण्याबाबत वाहतुकीकडून एनओसी घेण्यापूर्वी आम्ही जादा मनुष्यबळ मागितले होते. ते मंजूर झाल्यावर आमच्या (वाहतूक) एनओसीवर स्वाक्षरी करण्यात आली, वाहतूक पोलिसांनी सांगितले. — माटुंगा ट्रॅफिक डिव्हिजनमध्येच ६० ट्रॅफिक वॉर्डन तैनात केले जातील.

बीए रोड, सुलोचना शेट्टी मार्ग नो-पार्किंग झोन डॉ. बी. ए. रोड वरून अतिरिक्त वाहने नेण्यासाठी रुंद आहे. परंतु  येथे पार्किंगची समस्या आहे. हे टाळण्यासाठी डॉ. बी. ए. रोड आणि सुलोचना शेट्टी मार्ग (धारावीकडे जाणारा) सर्वांसाठी कडकपणे नो-पार्किंग झोन करण्यात येणार आहे. ट्रॅफिक वॉर्डनच्या मदतीने पूल पडल्यानंतर पहिल्या ८ दिवसात वाहतुकीचे सर्वेक्षण केले जाईल. डॉ. बी. ए. रोड येथे जर प्रवाह नियंत्रित असेल तर आम्ही पार्किंगसाठी काही सूट  देऊ कारण अनेक निवासी इमारती आहेत. पण तसे न आढळल्यास  दोन्ही बाजू नो-पार्किंग झोन राहतील. पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी वाहने कुर्ला मार्गे सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडकडे वळवली जातील, जो पूर्व द्रुतगती महामार्ग आणि आधीच कोलमडलेला मार्ग - लाल बहादूर शास्त्री मार्गाला जोडतो. दुसरा मार्ग म्हणजे सायन रुग्णालय परिसरातून सायनपुलाच्या पुढे, सुलोचना शेट्टी मार्गाने डॉ. बी. ए. शी जोडणारा मार्ग. धारावीतील कुंभारवाड्याकडे जाणारा बी. ए. वाहनधारकांसाठी तिसरा मार्ग चुनाभट्टी-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कनेक्टर आहे. 

टॅग्स :मुंबई