सायन रेल्वे पूलाचे पाडकाम २८ फेब्रुवारीच्या रात्रीपासून सुरु होणार
By सचिन लुंगसे | Published: February 26, 2024 07:21 PM2024-02-26T19:21:49+5:302024-02-26T19:23:01+5:30
मध्यंतरी झालेल्या बैठकीत पाडकाम करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या रेल्वे पुलाच्या पाडकांमाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई : सायन येथील रेल्वे पूल २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून पाडण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. मध्य रेल्वेकडून या संदर्भातील माहिती देण्यात आली असून, मध्यतंरी ऐन परीक्षेच्या हंगामात हा पूल पाडण्यात येऊ नये यासाठी सूत्रे हलली होती. त्यामुळे मध्यंतरी झालेल्या बैठकीत पाडकाम करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा या रेल्वे पुलाच्या पाडकांमाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
सायन येथील रेल्वे उड्डाणपूल ब्रिटिश कालीन आहे. १९१२ साली बांधण्यात आलेला हा पूल अत्यंत जुना झाला आहे. शिवाय मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी हा पूल पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे. मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन यांच्या एकत्रित कामकाजानुसार या पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे. २० जानेवारी रोजी या पूलाचे पाडकाम माती घेतले जाणार होते. मात्र स्थानिक परिसरातून विरोध झाल्यानंतर याबाबतचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्यानंतर २४ महिन्यात नवीन पूल बांधून पूर्ण केला जाईल. मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे प्रशासन एकत्रित यासाठी खर्च करेल.
सायन येथील रेल्वे पूल पाडण्यात आल्यानंतर मुंबईला पूर्व आणि पश्चिम जोडणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल होतील. दोन्ही बाजूकडील वाहनांना मोठा वळसा घालून मार्गक्रमण करावी लागेल.
मध्य रेल्वे महापालिकेच्या मदतीने सायन रेल्वे स्थानकाजवळ जुन्या रेल्वे पुलाच्या जागी नवीन पूल बांधणार असून, प्रकल्पाच्या खर्चासाठीचे २३ कोटी रुपये मध्य रेल्वे तर २६ कोटी रुपये महापालिका देणार आहे.
नवीन पूल हा सिंगल स्पॅन सेमी-थ्रू गर्डर्स ४९ मीटर लांबीचा आणि २९ मीटर रुंदीचा आरसीसी स्लॅब पद्धतीचा असेल.
मुंबई आयआयटीने स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टमध्ये आताचा पूल तोडून टाकण्याची आणि स्टील गर्डर आणि आरसीसी स्लॅबसह जुन्या पूलाच्या जागी नव्या पुलाची शिफारस केली होती.