प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला एप्रिलमध्ये होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 17:41 IST2025-03-25T17:40:31+5:302025-03-25T17:41:34+5:30
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील जगन्नाथ भातणकर मार्गावरील पुलाच्या पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता

प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाच्या पाडकामाला एप्रिलमध्ये होणार सुरुवात
मुंबई :
अटल सेतूची थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील १०० वर्षे जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी १० एप्रिलपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील जगन्नाथ भातणकर मार्गावरील पुलाच्या पाडकामाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर वर्षभरात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन एमएमआरडीएने केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, तसेच वांद्रे दिशेला जाता यावे यासाठी ४.५ किमी लांबीचा उन्नत मार्ग एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०२१ मध्ये सुरुवात झाली होती. त्यानुसार जानेवारी २०२४ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सद्य:स्थितीत केवळ ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेची अन्य भागातील कामे पूर्णत्वाच्या दिशेने आहेत. मात्र, भातणकर मार्गावरील रेल्वेपुलाचे बांधकाम रखडले आहे.
उड्डाणपुलाच्या पाडकामाने काय होणार..?
जगन्नाथ भातणकर मार्गाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते सेनापती बापट मार्गदरम्यानचा रस्ता वर्षभरासाठी बंद राहणार.
वाहतूक दक्षिणेकडे करी रोड पूल आणि उत्तरेकडे टिळक पुलावरून वळविणार .
परळ स्थानकाजवळील सध्याचा रेल्वेचा पादचारी पूल ‘नॉन-टिकट झोन’ म्हणून पादचाऱ्यांना खुला होईल.
प्रभादेवी स्थानकावर नवा पादचारी पूल दक्षिण बाजूला बांधला जात असून, तो लवकरच पूर्ण होईल.
वाहतूक वळविण्यासाठी पोलिसांकडून आराखडा
वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळत नसल्याने एमएमआरडीएला हा पूल बंद करणे शक्य नव्हते. विद्यार्थ्यांच्या दहावीच्या परीक्षा सुरू असल्यानेही स्थानिकांनी पुलाच्या पाडकामाला विरोध केला होता. आता दहावीची परीक्षा संपल्याने वाहतूक पोलिसांनी परवानगीची प्रक्रिया सुरू केली आहे. या पुलावरील वाहतूक अन्य दिशेने वळविण्यासाठी पोलिसांकडून आराखडा तयार केला जात आहे.
ही प्रक्रिया पूर्ण करून १० एप्रिलपूर्वी एमएमआरडीएला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये
उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व सेनापती बापट मार्गादरम्यान वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन लेन असतील.
दुसऱ्या स्तरावर अटल सेतूपासून वरळीकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन लेन असतील.
९५ मीटर व ३७ मीटर लांबीचे दोन स्पॅन.
उड्डाणपुलावरील सुपरस्ट्रक्चर वजन अनुक्रमे ३००० मेट्रिक टन आणि १२०० मेट्रिक टन.
१५६ मीटर शिवडीकडील पोहोच मार्गाची लांबी
२०९ मीटर वरळीकडील पोहोच मार्गाची लांबी
६० टक्के काम २०२४ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.