मुंबई - मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौरा करत आहेत. यादरम्यान नाशिकला असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गावर अमित ठाकरेंचा ताफा टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवला होता. त्यानंतर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील हा टोलनाका फोडला होता. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे अमित ठाकरेंनी यावर भाष्य करताना या टोलफोडीचे समर्थनच केलं आहे. त्यावरुन, आता सत्ताधारी भाजपने मनसे आणि अमित ठाकरेंवर बोचरी टीका केलीय.
भाजपने एका व्हिडिओच्या माध्यमातून अमित ठाकरेंवर टीका करताना, अमित ठाकरेंनी खोटं बोलल्याचंही ते म्हटलंय. सिन्नर येथील टोलनाक्यावर फास्टटॅगसंदर्भातील बिघाडामुळे अमित ठाकरेंची गाडी तब्बल ३ ते ३.३० मिनिटांपर्यंत थांबवण्यात आली होती. मात्र, त्यांनी आपली गाडी १० मिनिटे थांबवल्याचं म्हटलं. तसेच, समृद्धी महामार्गावरील या टोलनाक्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. यासंदर्भात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना जेव्हा संमजलं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आसुरी आनंद त्यांना लपवता आला नाही,'' असे म्हणत भाजपने मनसेच्या टोल नाक्यावरील तोडफोडीनंतर मनसे आणि अमित ठाकरे यांना लक्ष्य केलंय.
भाजपने टोलनाक्यावरील तोडफोडीच्या घटनेचा व्हिडिओ पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला असून अमित ठाकरेंवर टीका केलीय. तसेच, ''अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा'', असा सल्लाच भाजपने मनसेच्या युवराजांना दिला आहे. त्यानंतर, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपवर पलटवार केला आहे. ''मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपाला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का?'', असा सवालच मनसेच्या देशपांडे यांनी विचारला आहे. त्यामुळे, आता भाजपा आणि मनसेत सामना रंगणार असल्याचे दिसून येते.
अभिनेत्याचीही मनसेवर टीका
अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर अभिनेता आरोह वेलणकरने केलेलं ट्विटही चांगलंच चर्चेत आहे. आरोहने मनसे कार्यकर्त्यांचा समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडतानाचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. “हा काय फालतूपणा आहे. म्हणून कोणी मत देत नाही,” असं आरोहने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.