इकोरीकोकडून ई-कचरा हाताळण्याचं प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:07 AM2021-03-18T11:07:19+5:302021-03-18T11:08:39+5:30
मुंबई, ठाणे व जवळपासच्या विविध भागात कंपनीने १०० इको-बिन बसवले
मुंबई: इको रीसायकलिंग लिमिटेड, ही देशातील एक अग्रगण्य व ई - कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील एकमेव लिस्टेड कंपनी आहे. ही कंपनी आता जगाला ई कचऱ्याची म्हणजेच वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट (डब्ल्युईईई) ची विल्हेवाट कशी लावायची हे दाखवून देत आहे. बुक माय जंक या आपच्या मदतीने ही मोहीम सुरू करण्यात आली असून मोहीम आता देशाच्या आर्थिक राजधानीत आणि आजूबाजूच्या परिसरात आता मूळ धरायला लागली आहे.
विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या वापर करणाऱ्या पर्यावरणप्रेमींना ही उपकरणे टाकून द्यायची असतील त्यांचा हा ई कचरा गोळा करण्यासाठी आणि त्याचे रीसायकलिंग करण्यासाठी कंपनीने बुक माय जंक हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. आर्थिक लाभ मिळण्यापेक्षा पर्यावरणाला अधिक महत्त्व देणाऱ्या लक्ष्य गटाकडून या ॲपला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ॲपच्या बीटा चाचणी दरम्यान नोंदणीकृत सभासदांच्या सोयीसाठी ६९२ भागांतून ११८ फेऱ्या करून ई कचरा गोळा केला. या ई कचऱ्यात मोबाईल फोन, चार्जर, लॅपटॉप, कीबोर्ड, माऊस, टीव्ही, डेस्कटॉप, मिक्सर, ओव्हन, इस्त्री, फ्रीज, वॉशिंग मशिन वगैरे सामग्रीचा समावेश होता.
ई कचरा निर्मितीमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक असून देशात वर्षाला ३.२ दशलक्ष मेट्रिक टन इतका ई कचरा निर्माण होतो . त्यापैकी सुमारे ३० टक्के पश्चिम भारतात निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर बुक माय जंक हे ॲप महत्वपूर्ण ठरते. कारण लोकांच्या घरून ई कचरा शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक सामग्री निर्माण करणाऱ्या निर्मात्यांना ई कचरा व्यवस्थापन नियम पाळण्याच्या दृष्टीने एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे.
वाढते डिजिटलायझेशन, ऑनलाईन पेमेंट, स्मार्ट सिटी प्रकल्प, तंत्रज्ञानात होणारे बदल या मुळे देशाच्या ई कचऱ्यात वाढ होत आहे. सन २०२५ पर्यंत देशाचा ई कचऱ्याचा आकडा ८ दशलक्ष मेट्रिक टन वर जाण्याचा अंदाज आहे. देशातील एकमेव ई कचरा रीसायकलिंग लिस्टेड कंपनी इको रीसायकलिंग लिमिटेड चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. बी. के. सोनी म्हणाले, "आपल्या वाढत्या ई कचऱ्याची काळजी करण्याची गरज नाही. कारण ही वाढ आपली सामाजिक - आर्थिक प्रगती दर्शवते. बूक माय जंक हे वापरायला सोपे असे ॲप असून त्या माध्यमातून जनता तसेच संस्था आपला ई कचरा संकलन व रिसायकल जबाबदारीने करू शकतात. केवळ ग्राहकच नव्हे तर मूळ उत्पादक तसेच नियामक संस्थांना आपले नियम राबविण्यासाठी व लक्ष्य सहज साध्य करण्यास बुक माय जंक हे ॲप उपयुक्त ठरत आहे. असे म्हटले जाते की जागरूकतेचा अभाव व आर्थिक बाबींमुळे अनेकदा ग्राहक आपल्या ई कचऱ्याची अयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावतात. परंतु कृतीला जागरूकतेची जोड दिल्यास अधिक मोठा व शाश्वत परिणाम दिसतो यावर बुक माय जंकचा विश्वास आहे."
क्रयशक्ती समतेच्या दृष्टीने जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून भारतासाठी बुक माय जंक हा पुढाकार महत्वपूर्ण ठरतो. कारण देशातील युवा तसेच कमावत्या लोकसंख्ये कडून इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मोठी मागणी आहे. परंतु त्याच वेळी, या ई कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट होत असल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे आणि पर्यावरण व्यवस्थेचा ऱ्हास येणारी अनेक पिढ्यांना भोगावा लागेल. इलेक्ट्रॉनिक वस्तू अयोग्य पध्दतीने फेकून दिल्यास त्यातून विषारी रसायने बाहेर पडतात आणि त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवरील माती, हवा, जल आणि पर्यायाने मानवी आरोग्यावर होतो.