मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा तोडगा काढला जात नाही. शनिवारी आणखी आक्रमकपणे संप करण्यात येणार आहे. राज्यातील आगारासमोर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत शनिवारपासून निदर्शने केली जाणार आहेत, अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
एसटीच्या आंदोलनाच्या संदर्भात परिवहनमंत्र्यांबरोबर स्वतंत्र बैठक झाली नाही. जी बैठक झाली ती सर्वांसमक्ष एकत्र झाली होती. परिवहनमंत्री दिशाहीन वक्तव्य करून खोटे बोलत आहेत, असा आरोप शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, एसटी कर्मचारी आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी राज्य सरकार पोलिसांना समोर आणून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांचे निलंबनही केले.
कोणताही चर्चेचा प्रस्ताव आंदोलनस्थळी आला नाही. तातडीने अनिल परब यांचा राजीनामा घ्यावा. नवीन परिवहनमंत्री येईल, त्याच्याबरोबर आम्ही चर्चेला तयार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅश भरण्याच्या कंत्राटासाठी बाहेरच्या व्यक्तीला ९ कोटी दिले जातात, ते कशाला हवे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करणार आहे की नाही? विलीनीकरणाची आमची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘खासगी मालकाची गाडी-शिवशाही बंद करा’
एसटी महामंडळ तोट्यात कसे गेले, याचा खुलासा सरकारने द्यावा. वेतन कर्मचाऱ्यांना कसे देता येईल, याचा तपशील आम्ही सरकारला देतो. मात्र राज्याचे परिवहनमंत्री दिशाहीन वक्तव्य करून खोटे बोलत आहेत. शिवशाही बंद करा, ती खासगी मालकाची गाडी आहे. वाहक एसटीचा, डिझेल एसटीचे, प्रति किलोमीटर १८ रुपये द्यायचे, गाडी थांबून राहील तरी पैसे द्यायचे. या सगळ्यात मंत्री आणि अधिकाऱ्यांपर्यंत कोट्यवधी रुपयांचा मलिदा जातो, असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.