Join us

बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या विरोधात निदर्शने

By admin | Published: December 14, 2015 1:35 AM

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या विरोधात कोपरखैरणे येथे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले

नवी मुंबई: संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या आगामी चित्रपटाच्या विरोधात कोपरखैरणे येथे हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. हिंदू समाज व्यवस्थेला धक्का देणाऱ्या या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकांच्या वतीने करण्यात आली. या चित्रपटाचे ट्रेलर, टिझर आणि पिंगा पिंगा या गाण्यातून इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. या गाण्यात बाजीरावांची पत्नी काशिबाई आणि मस्तानी यांना एकत्र नृत्य करताना दाखवण्यात आले आहे. भन्साळी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वत:चा गल्ला भरण्यासाठी आदर्श कुटुंब व्यवस्थेला धक्का दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हिंदू जनजागृती समितीने चित्रपट परीक्षण मंडळ तसेच केंद्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे या चित्रपटाच्या विरोधात याअगोदरच तक्रार केली आहे. चित्रपटातील इतिहासाचे विकृतीकरण वगळावे, अन्यथा हा चित्रपट प्रदर्शित होवू दिला जाणार नाही, असा इशारा यावेळी राष्ट्रीय हिंदू आंदोलन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला. कोपरखैरणे सेक्टर १५ येथील गुलाब सन्स डेअरीसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संस्थेचे डॉ. उदय धुरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)