मुंबई : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली.दरम्यान, मराठा समाजातील आमदारांविरोधातही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये आरक्षणावर गप्प असलेल्या आमदारांना श्रद्धांजली वाहून मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. याशिवाय सोलापूरमध्ये शनिवारी मुंडण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर २५ जुलैला कल्याणमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या सोशल मीडिया टीमने विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. नवी मुंबई समन्वयकांनी गुरूवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन शुक्रवारीही कायम ठेवल्याचे दिसले.
मुंबईत मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:53 AM