टिसच्या विद्यार्थ्यांची चेंबूरमध्ये निदर्शने; लाठीहल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 06:19 AM2019-12-17T06:19:08+5:302019-12-17T06:19:11+5:30
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स ते आंबेडकर उद्यानापर्यंत लाँग मार्च
मुंबई : जामिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वादग्रस्त नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात (कॅब) निदर्शने केली. दिल्ली पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला केला. या कारवाईमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले व काही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. याच्या निषेधार्थ देवनार येथील टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी चेंबूरमध्ये निदर्शने केली. टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स ते आंबेडकर उद्यान चेंबूर असा लाँग मार्च विद्यार्थ्यांतर्फे काढण्यात आला. हातात सरकारच्या विरोधातले फलक आणि सरकारविरोधी घोषणाबाजी करीत अनेक विद्यार्थी या लाँगमार्चमध्ये सहभागी झाले होते.
टिसच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या लाँगमार्चमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचा लाँग मार्च आंबेडकर उद्यान येथे पोहोचताच विद्यार्थ्यांनी तब्बल तीन तास उद्यानाबाहेर ठिय्या दिला होता.
दिल्ली पोलीस व सरकारविरोधातल्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. पोलिसांचा मोठा ताफा तसेच दंगल नियंत्रण पथकाच्या गाड्यांमुळे संपूर्ण परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. यामुळे चेंबूर स्थानक परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
निषेध कायम राहणार
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विद्यार्थ्यांना घाबरवत आहे. मागील सहा वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी संघटनांमधील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. प्रत्येकवेळी विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यावर अशाच प्रकारे त्यांचा आवाज दाबण्यात येतो. अशा घटनांचा निषेध कायम राहणार असून तो वेळोवेळी करण्यात येईल. - नाझीया सय्यद, विद्यार्थिनी
हुकूमशाही चालणार नाही
नागरिकता संशोधन कायदा धर्मनिरपेक्षतेविरोधी, लोकशाहीविरोधी व मुस्लीमविरोधी आहे. सरकार भारत देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहत आहे. देश एका मोठ्या संकटात सापडलेला असताना नागरिक रस्त्यावर आल्यावर त्यांना पोलीस बळाचा वापर करून शांत केले जाते. ही हुकूमशाही या देशात चालणार नाही.
- सूरज कुमार, विद्यार्थी
घटना निषेधार्ह
शांततेत निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी अमानुष पद्धतीने लाठीचार्ज केला आहे. विद्यापीठात मुलींच्या वसतिगृहात तसेच लायब्ररीमध्ये घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारले व अटक केली आहे. संपूर्ण विद्यापीठात तोडफोड करून विद्यापीठाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करते.
- वनश्री, विद्यार्थिनी