मुंबई :
सुनियोजित कटाप्रमाणे आंदोलक सिल्व्हर ओक परिसरात धडकले. मात्र, शरद पवार यांचा बंगला नेमका कुठे आहे? हे माहिती नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला व ते कुठल्याही दिशेने दगडफेक करू लागले. यातच तेथे बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना एका बंद बंगल्याच्या दिशेने वळवले. त्यामुळे या मंडळींनी शरद पवार यांचाच बंगला समजून, बंगल्याच्या प्रवेशद्वारावर दगडफेक, तसेच चप्पल मारून राग व्यक्त केल्याचे तपासात समोर आले.
पोलीस हवालदार सतीश पांडव (४५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. उच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल जाहीर केल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी ७ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या घरात घुसून जाब विचारू, असा इशारा दिला. शुक्रवारी सिल्व्हर ओकच्या दिशेने आंदोलक येणार असल्याची माहिती मिळताच तेथे बंदोबस्त तैनात करण्यात आला. तेव्हा ९० ते १०० आंदोलक येताना दिसताच त्यांना आझाद मैदानाकडे जाण्यास सांगितले. मात्र, ते बॅरिकेडस् तोडून सिल्व्हर ओकच्या दिशेने निघाले. त्यामुळे घटनेच्या दिवशीही माहिती मिळूनही पोलिसांचा जास्तीचा फौजफाटा तैनात का केला नाही? असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. गावदेवी पोलिसांनी ११० जणांना अटक केली. यामध्ये २३ महिलांचा समावेश आहे. सर्वांचे मोबाइल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविले आहेत, तसेच आंदोलक चौकशीला सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सदावर्ते यांच्या घराची पोलिसांकडून झाडाझडती 1. या गुन्ह्याशी संबंधित पुरावे मिळवण्याच्या दृष्टीने गावदेवी पोलिसांच्या पथकाने रविवारी गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी झाडाझडती घेतली. आंदोलनानंतर पोलीस उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांच्याकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला होता. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांची परिमंडळ २चे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारत अधिक तपास सुरू केला आहे. 2. सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी सुरू आहे. त्यांना एलटी मार्ग येथील कोठडीत ठेवण्यात आले होते. रविवारी त्यांना गावदेवी पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. यामध्ये गावदेवी पोलिसांनी सदावर्ते यांच्यासह ११० जणांना अटक केली. सदावर्ते ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत आहे. सोमवारी कोठडी संपत असल्याने त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी करत त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.