मुंबईत सहा महिन्यांत डेंग्यूचे १४ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:49 AM2017-11-06T04:49:22+5:302017-11-06T04:49:24+5:30
गेल्या सहा महिन्यांत राज्यामध्ये डेंग्यूचे एकूण १७ बळी गेले आहेत, त्यातील १४ रुग्ण मुंबईतील आहेत़ महापालिकेच्या सावर्जनिक आरोग्य विभागाने ही माहिती जाहीर केली आहे़
मुंबई : गेल्या सहा महिन्यांत राज्यामध्ये डेंग्यूचे एकूण १७ बळी गेले आहेत, त्यातील १४ रुग्ण मुंबईतील आहेत़ महापालिकेच्या सावर्जनिक आरोग्य विभागाने ही माहिती जाहीर केली आहे़ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही पालिकेने केली आहे़
गेल्या काही महिन्यांत डेंग्यूसदृश्य रुग्णांच्या संख्येतही भर पडल्याचे अहवालातून समोर आले आहे. १ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान शहर-उपनगरात ३ हजार २९३ डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात ४ हजार ९८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, जानेवारी ते आॅगस्टमध्ये डेंग्यूचे २९३ रुग्ण आढळले आहेत, तसेच मलेरिया, हेपेटायटिस, गॅस्ट्रो, लेप्टो आणि स्वाइन फ्लू या आजारांचेही सावट कायमच असल्याचे दिसून येत आहे.
मुंबईकरांना आता थंडावा जाणवू लागला आहे. आजारांपासून बचाव करण्यासाठी वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. या आजारांविषयी सांगताना डॉ. नयना कांगणे यांनी सांगितले की, सध्या खोकला, ताप आणि सर्दी याचा बºयाच जणांना त्रास होतोय. बºयाचदा हे आजार अंगावर काढणे, घरगुती औषध घेणे यामुळे आजार बळावतात. त्यामुळे वेळीच ही लक्षणे ओळखून डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.