घणसोलीत डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू
By admin | Published: July 25, 2015 10:37 PM2015-07-25T22:37:44+5:302015-07-25T22:37:44+5:30
शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू झाली आहे. घणसोली गावामध्ये डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. अनेकांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबई : शहरात डेंग्यू व मलेरियाची साथ सुरू झाली आहे. घणसोली गावामध्ये डेंग्यूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. अनेकांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाऊस सुरू झाल्यापासून शहरात तापाची साथ पसरली आहे. डेंग्यू व मलेरियाच्या संशयित रुग्णांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढत आहे. घणसोली गावामध्ये राहणाऱ्या राखी सुरेश गायकर यांनाही डेंग्यूची लागण झाली होती. वाशीतील हिरानंदानी फोर्टीज रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. प्रशोभ प्रभाकर नायर या तरुणावर कोपरखैरणेमधील गगनगिरी रुगालयात उपचार सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला आहे. दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय गावातील प्रतीक म्हात्रे, मनाली पाटील, विशाल मढवी, भरत मढवी, चंद्रकांत भोपी, रोनीत वैती यांच्यासह ३० ते ४० जण उपचार घेत आहेत.
गावात तापाची साथ सुरू असताना धुरीकरण व औषध फवारणी व्यवस्थित होत नसल्याविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी नगरसेवक दीपक पाटील यांनी गावातील डेंग्यू व मलेरियाच्या साथीविषयी ठोस उपाययोजना करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. जखमी रुग्णांचे वैद्यकीय अहवालही त्यांनी प्रशासनास सादर केले आहेत. त्वरित योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर महापालिकेविरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
करावेत साथ
घणसोलीप्रमाणे महापालिका मुख्यालयाच्या जवळच असलेल्या करावे गावामध्येही डेंग्यू, मलेरियाची साथ सुरू झाली आहे. तापाचे रुग्णही वाढले आहे. महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करत नसल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अॅड. सुवर्णा भालचंद्र मढवी यांनी सांगितले की, तापाच्या साथीमुळे नागरिक त्रस्त असले तरी महापालिका प्रशासन अद्याप गंभीर नाही.