Join us

मुंबईत आढळले डेंग्यू, मलेरियाच्या डासांचे अड्डे; महापालिकेने बजावली ३० जणांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:23 AM

तीन महिन्यांत चार लाख जागांची तपासणी; इमारतींसह घरांची पाहणी

मुंबई : पावसाळ्यापूर्वी डासांच्या उत्पत्तीस पोषक ठिकाणे उद्ध्वस्त करण्यासाठी महापालिकेने तपासणी सुरू केली आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने इमारती आणि घरांच्या केलेल्या पाहणीत ६०६ ठिकाणी मलेरिया, ३१०२ ठिकाणी डेंग्यू तर २७२४ ठिकाणी दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. याची गंभीर दखल घेत पालिका प्रशासनाने तातडीने संबंधितांना नोटीस बजावली आहे. अशा प्रकारे दररोज ३० जणांना नोटीस पाठविण्यात येत असल्याने ही बाब पालिकेसाठीही चिंताजनक ठरत आहे.

पावसाळ्यात मुंबईमध्ये साथीचे आजार बळावतात. विशेषत: डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा प्रसार वाढतो. यामुळे रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही पावसाळ्याच्या चार महिन्यांत वाढतो. अस्वच्छता आणि पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणाºया डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे ही ठिकाणे पालिकेकडून नष्ट केली जातात. या वर्षीही पालिकेने गेल्या तीन महिन्यांत चार लाख ठिकाणांची पाहणी केली.

जानेवारीपासून केलेल्या या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली. इमारती व चाळ, झोपडपट्टींमधील पाहणीत ६०६ ठिकाणी मलेरिया पसरविणाºया एनॉफिलीज स्टिफेन्सी डासांच्या अळ्या, ३१०२ ठिकाणी डेंग्यू पसरवणारे एडिस इजिप्ती तर २७२४ ठिकाणी दोन्ही आजार पसरविणारे डास आढळले आहेत. पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणी स्वच्छता ठेवून अशा डासांचा प्रसार रोखण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

६०६ ठिकाणी मलेरियाचे डासपालिकेने केलेल्या तपासणीत ६०६ ठिकाणी मलेरियाचे डास आढळून आले आहेत. डेंग्यू-मलेरिया उत्पन्न करणारी ठिकाणे आढळल्यास पालिकेकडून आधी नोटीस पाठविणे व दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र या नोटीसची दखल घेऊन खबरदारी न घेतल्यास पालिकेमार्फत न्यायालयीन कारवाईदेखील करण्यात येते. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून केलेल्या कार्यवाहीत आठ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या ठिकाणी होते उत्पत्तीमलेरियाचा प्रसार करणारे एनाफिलीस स्टिफेन्सी डास याची उत्पत्ती विहिरी, पाण्याच्या टाक्या, कारंजे, कुलिंग टॉवर, पाण्याचे हौद, इमारत बांधकामाची ठिकाणे आदी ठिकाणी होते.

डेंग्यूचा प्रसार करणारे एडिस इजिप्ती डास यांची उत्पत्ती फेंगशुई झाड, बांबू प्लँट्स, मनीप्लँट्ससारखी शोभिवंत झाडे, घराजवळील कुंड्या, वातानुकूलन यंत्रे आदी ठिकाणी होते.

टॅग्स :डेंग्यूमुंबई