मुंबई: पावसाळा सुरु झाल्यावर मुंबई शहरात वाढणाऱ्या साथींच्या आजारांत डेंग्यूच्या रुग्णांची गेल्या पाच वर्षांत वाढत होत असल्याचे प्रजा फाऊंडेशनने माहितीच्या अधिकाराखाली जमा केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. सात दिवस अथवा अधिक काळ स्वच्छ साचलेले पाणी तसेच राहिल्यास त्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची (एडिस इजिप्ती) पैदास होते. एप्रिल २०११ ते मार्च २०१६ या पाच वर्षांच्या कालावधीत मुंबईत एकूण १५ हजार २४४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. तर, एप्रिल २०११ ते मार्च २०१२ या आर्थिक वर्षात मुंबईत डेंग्यूचे १ हजार ८७९ रुग्ण आढळून आले होते. गेल्या पाच वर्षांत २० ते ५९ वयोगटातील व्यक्तींना डेंग्यूची लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटातील ४२.६५ टक्के व्यक्तींना डेंग्यूची लागण झाली होती. त्याखालोखाल ० ते १९ वयोगटातील व्यक्तींचा क्रमांक आहे. कारण, या वयोगटातील ४२.०२ टक्के जणांना डेंग्यूची लागण झाली होती. तर, ज्येष्ठ नागरिकांमध्ये १३.८७ टक्के जणांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे पावसाळ््यानंतर अधिक असल्याचे दिसते. जानेवारी ते एप्रिल महिन्यांत ६.३० टक्के डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. मे ते आॅगस्ट यादरम्यान रुग्णांचे प्रमाण वाढले होते. हे प्रमाण १९.३३ टक्के इतके आहे. आॅगस्टनंतर पाऊस कमी झाल्यानंतर डिसेंबरपर्यंत डेंग्यूच्या रुग्णांचा आलेख चढता असतो. या काळात गेल्या पाच वर्षांत ७४.३७ टक्के रुग्ण आढळले.मुंबईतील सहा वॉर्डमध्ये डेंग्यूमुळे मृत्यू अधिक झाले आहेत. अंधेरी पश्चिम (के-पश्चिम) ६९, भायखळा (ई) ४५, परेल (एफ-दक्षिण) ४१, अंधेरी पूर्व (के-पूर्व) ३१, माटुंगा (एफ-उत्तर) ३१, मालाड (पी-दक्षिण) २७ आणि दादर (जी-दक्षिण) २५ अशी या वॉर्डांची संख्या आहे. (प्रतिनिधी)
मुंबईत पाच वर्षांत डेंग्यूत वाढ
By admin | Published: October 04, 2016 3:05 AM