मुंबई : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य, साथीच्या व कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या नॅशनल हेल्थ प्रोफाइलच्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत डेंग्यूमुळे २३० जणांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूचे ३९ हजार १४१ रुग्ण आढळून आले आहेत, तर १ जानेवारी ते नोव्हेंबर, २०१९ या कालावधीत राज्यभरात ९ हजार ८९९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली असून, १२ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यात २०१४ मध्ये डेंग्यूचे निदान झालेल्या ८ हजार ५७३ रुग्णांची नोंद केली होती, यात ५४ जणांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये या आकडेवारीत वाढ होऊन ती ११ हजार ११ वर पोहोचली असून, ५५ जणांना जीव गमवावा लागला.राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात २ हजार ४७ जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर यंदाच्या वर्षी संख्येत वाढ होऊन ती २ हजार ७५५ वर पोहोचवली आहे. याविषयी, डॉ. सौमित्र सहानी यांनी सांगितले की, या वर्षी अजूनही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचते आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे डास तयार होत आहेत. हे वातावरण डेंग्यूच्या डासांसाठी पोषक असल्याने ते अधिक काळ जिवंत राहतात. यासाठी घराबाहेर पाणी अधिक काळ साचू देऊ नये, वेळोवेळी औषधांची फवारणी करावी, बाहेरून आल्यावर हात - पाय स्वच्छ धुवावेत, तसेच ताप किंवा सर्दी जास्त दिवस असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. सहानी म्हणाले.>मृत्यूच्या प्रमाणात घटराज्यात डेंग्यू रुग्णांची संख्या प्रकर्षाने वाढते आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अंदाजित दीड हजार रुग्ण वाढले आहेत, पण मृत्यूंचा आकडा कमी झाला आहे. डेंग्यूसंदर्भात जागरूकता आणि योग्य ते उपचार तातडीने उपलब्ध करून दिले जात असल्याने मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे.- डॉ. प्रदीप आवटे, संसर्गजन्य नियंत्रण विभाग प्रमुख,सार्वजनिक आरोग्य विभाग.
पाच वर्षांत राज्यात डेंग्यूमुळे २३० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:27 AM