नवी मुंबई : महापालिका क्षेत्रामध्ये डेंगीची साथ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खाडीकिनारी सुरू असलेली मत्स्य शेती, मुलुंड परिसरातील मिठागरांमध्येही मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. डासांना रोखण्यासाठी धूर फवारणी करणे आवश्यक असले तरी मत्स्यशेतीच्या तलावांमध्ये या फवारणी विरोध होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नवी मुंबईमध्ये तापाची साथ सुरू असून डेंगीच्या संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे.साथीला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने डास उत्पत्ती ठिकाणांचा शोध घेतला जात आहे. दिवाळे ते ऐरोलीपर्यंतच्या खाडीकिनारी कोळी बांधव मोठ्या प्रमाणात मत्स्यशेती करत आहेत. भरती आली की खाडीचे पाणी अडविले जाते. त्यामध्ये माशांची पालन केले जाते. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीमध्ये या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी अळीनाशक औषधांची फवारणी करणे आवश्यक आहे. परंतु तलावातील मासे मरतील या भीतीने औषध फवारणी करू दिली जात नाही. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील मुलुंड, भांडुप भागातील खाडीकिनारी मोठ्याप्रमाणात मिठागरे सुरू आहेत. मीठ उत्पादनासाठी साठविलेल्या पाण्यामध्येही डासांची उत्पत्ती होत असून त्याचा त्रास ऐरोली, घणसोली व राबाडेला होत आहे. आयुक्त व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मत्स्यशेती परिसराची पाहणी करून सदर ठिकाणी औषध फवारणी करून द्यावी असे आवाहन संबंधितांना केले.(प्रतिनिधी)
मत्स्यशेतीत डेंगीच्या अळ्या
By admin | Published: November 06, 2014 2:00 AM