सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये डेंग्यूच्या अळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 10:29 AM2022-10-26T10:29:30+5:302022-10-26T10:29:49+5:30
डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांच्या अळ्यांची पैदास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात होत असून सलमानला डास चावल्याने डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला डेंग्यूची लागण झाली असून खबरदारी म्हणून महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये विशेष शोधमोहीम राबवली. या मोहिमेत अपार्टमेंटमधील अडगळीच्या जागेत पालिकेला डेंग्यूच्या अळ्या सापडल्या असून डासांची उत्पत्ती स्थाने कीटकनाशक विभागाने नष्ट केली आहेत.
डेंग्यू पसरविणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांच्या अळ्यांची पैदास प्रामुख्याने स्वच्छ पाण्यात होत असून सलमानला डास चावल्याने डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कीटकनाशक विभागाने सलमान राहत असलेल्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलक्सी इमारतीच्या परिसराची झाडाझडती घेतली.
त्यावेळी अडगळीच्या दोन ठिकाणी डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची आणि अळ्यांची उत्पत्ती स्थाने आढळली. त्या ठिकाणी कीटकनाशक औषधे फवारणी करण्यात आली असून ही उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आल्याची माहिती कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजेंद्र नारिंग्रेकर यांनी दिली.
इतर घरांची पाहणी
कीटकनाशक विभागाने सलमान राहत असलेल्या विभागातील ३०८ घरांची पाहणी केली. त्यात ३२३ कंटेनर तपासण्यात आले. त्यामध्ये दोन ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. तर डेंग्यूच्या अळ्या वाढू शकतात असे २७ भंगार साहित्य नष्ट करण्यात आले आहेत. याशिवाय सलमान राहत असलेल्या ५ विभागात व २८७ झोपड्यांमध्ये धूर फवारणी करण्यात आल्याचे नारिंग्रेकर यांनी सांगितले.