डेंग्यूपाठोपाठ मलेरियाचा ‘ताप’

By admin | Published: November 19, 2014 11:02 PM2014-11-19T23:02:50+5:302014-11-19T23:02:50+5:30

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाली असताना ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्यानेच या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे

Dengue lymphoma 'heat' | डेंग्यूपाठोपाठ मलेरियाचा ‘ताप’

डेंग्यूपाठोपाठ मलेरियाचा ‘ताप’

Next

अजित मांडके, ठाणे
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत पाचपट वाढ झाली असताना ठाणे महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्यानेच या रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. शहरात आजघडीला डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले असून त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे डेंग्यूची शहरात लागण होत असताना याच कालावधीत तब्बल १६८२ जणांना मलेरियाची लागण झाल्याची माहितीदेखील आता समोर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मलेरियाच्या रुग्णांत तिपटीने वाढ झाली असून यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाला जागे करण्यासाठी गुरुवारच्या महासभेत सर्वपक्षीय सदस्य आक्रमक होणार असून आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली जाणार आहे.
मुंबईपाठोपाठ ठाण्यातही डेंग्यूचा फैलाव वाढला आहे. मागील वर्षी शहरात डेंग्यूचे केवळ १२ रुग्ण आढळले होते. त्यात एकाचाही मृत्यू झाला नव्हता. परंतु, यंदा किंबहुना मागील तीन ते चार महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहरात आजघडीला ९६ डेंग्यूचे रुग्ण असून त्यात एका अकरावर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. १ नोव्हेंबरपर्यंत डेंग्यू रुग्णांचा आकडा ६८ होता. परंतु, मागील १५ दिवसांत त्यात २८ रुग्णांची वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १३० जणांचे पथक तयार केले आहे. या पथकाद्वारे घरोघरी जाऊन साठवणुकीच्या पाण्याची तपासणी केली जात आहे. तसेच डेंग्यूबाबत जनजागृतीही केली जात आहे. पोस्टर, बॅनर, लाऊडस्पीकर, चित्रफीत, केबल चॅनल, वृत्तपत्रे आदींच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.
आतापर्यंत शहरातील २ लाख ६२ हजार ३५० घरांची तपासणी करण्यात आली असून त्यात १३ हजार २४४ घरांत दूषित पाणी आढळल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, २ लाख १२ हजार ३९९ साठवणूक केलेल्या पाण्याच्या पिंपांंची तपासणी करण्यात आली. त्यातील ८ हजार ८१७ पिंपांत डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. ८३ हजार ५५४ घरांमध्ये आतापर्यंत फवारणी केल्याचा कागदी हिशेब पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केला आहे.
हा हिशेब जाहीर करीत असताना डेंग्यूबरोबरच शहरात मलेरिया जोमाने फैलावत असल्याची माहितीही डेंग्यूचा गाजावाजा सुरू असताना गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. परंतु, आता तीदेखील समोर आली असून आरोग्य विभागाने आतापर्यंत ९५ हजार ७६८ जणांच्या रक्ताचे नमुने तपासले होते. त्यातील १६८२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. मलेरियामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी हाच आकडा ७४७ एवढा होता. परंतु, यंदा त्यात तिपटीने वाढ झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते जून या कालावधीत ६८७ मलेरियाचे रुग्ण आढळून आले. परंतु, त्यानंतर पुढील पाच महिन्यांत यात ९९५ रुग्णांची वाढ झाली असून एकूण १६८२ जणांना मलेरियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, पालिकेतील नगरसेवकांनी डेंग्यूलाच अधिक महत्त्व दिल्याने मलेरिया आणि इतर आजारांविषयी तेदेखील अनभिज्ञ राहिल्याचे या आकडेवारीवरून दिसते. त्यामुळे आता डेंग्यू रुग्णांच्या तुलनेत मलेरियाच्या रुग्णांचा आकडा तिपटीपेक्षाही अधिक असल्याने नगरसेवक महासभेत याबाबतीत जाब विचारणार का, हादेखील महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Dengue lymphoma 'heat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.