Join us  

शहरात डेंग्यू, मलेरियाचे संशयित वाढले

By admin | Published: September 09, 2016 3:28 AM

सिडको नोडमध्ये डेंग्यू, मलेरियासारखे धोकादायक साथीचे आजार बळावत आहेत. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, उलवे, कामोठे या सिडको नोडमध्ये डेंग्यूचे २१ तर मलेरियाच्या संशयित रुग्णाची

वैभव गायकर , पनवेलसिडको नोडमध्ये डेंग्यू, मलेरियासारखे धोकादायक साथीचे आजार बळावत आहेत. खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, उलवे, कामोठे या सिडको नोडमध्ये डेंग्यूचे २१ तर मलेरियाच्या संशयित रुग्णाची संख्या ४१ वर पोहोचली आहे. ही आकडेवारी सिडकोला प्राप्त झालेल्या माहितीवरून देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचरा वेळोवेळी उचलला न जाणे, बांधकामांच्या ठिकाणी साचलेले पाणी, डासांचा प्रादुर्भाव यामुळे हे आजार पसरत आहेत. प्रशासन यासाठी सज्ज असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सिडको नोडमध्ये कचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे. नियमित कचरा उचलला जात नसल्याने शहरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे साथीचे आजारही बळावत आहेत. खारघर, उलवे नोडमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी आलेला मजूर वर्ग स्थलांतरित आहे. बांधकामासाठी वापरले जाणारे पाणी अनेक दिवस साचून ठेवल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून, साथीचे आजार बळावत आहेत. त्यामुळे खारघर उलवे नोडमध्ये संशयितांची संख्या वाढत आहे. सिडकोच्या आरोग्य विभागाच्या वतीने अशा बांधकामधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांनी दिली. मलेरिया, डेंग्यूच्या नियंत्रणासाठी सिडको नोडमध्ये १० जणांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. बॅनर्स व रिक्षा फिरवून, जनजागृती करण्यात येत आहे. सिडकोच्या आरोग्य केंद्रात एकूण ५६ कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून, त्यांच्याद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. सिडको नोडमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर होत आहे. सिडकोमार्फत बीव्हीजी कंपनीला कचरा उचलण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र बीव्हीजीचे कर्मचारी वारंवार संपावर जातात. त्यामुळे शहरातील कचरा पडून राहत असल्याने दुर्गंधी पसरते; शिवाय रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील कचरा, सांडपाणी व्यवस्थापनावर भर दिल्यास, डासांचा प्रादुर्भाव टळेल. परिणामी, रोगराईवर नियंत्रण मिळवता येईल.