उच्चभ्रू वस्त्यांमध्ये डेंग्यूचे डास
By admin | Published: September 19, 2015 04:23 AM2015-09-19T04:23:43+5:302015-09-19T04:23:43+5:30
सप्टेंबरच्या १५ दिवसांत उच्चभ्रू वस्त्या, सोसायटी, इमारती आणि चाळींमध्ये १ हजार ५०४ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत, तर झोपडपट्टी परिसरात केवळ
मुंबई : सप्टेंबरच्या १५ दिवसांत उच्चभ्रू वस्त्या, सोसायटी, इमारती आणि चाळींमध्ये १ हजार ५०४ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत, तर झोपडपट्टी परिसरात केवळ १५४ ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत.
डेंग्यूच्या डासांची पैदास ही स्वच्छ पाण्यात होते. झोपडपट्टी भाग सोडून इतर ठिकाणी राहणाऱ्यांच्या घरात डेंग्यूच्या डासांची पैदास होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीही जास्त होते. यानंतर वारंवार जनजागृती करूनही कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसून आलेली नाही. यंदाही झोपडपट्टी भागापेक्षा इतर भागांमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने अधिक आढळून आली आहेत. डेंग्यू रोखण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे, असे महापालिकेने आवाहन केले आहे.
डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू आणि मलेरियाला रोखण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत डेंग्यू आणि मलेरिया रोखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. १८ सप्टेंबरला एच पश्चिम वॉर्डमधील झोपडपट्टीत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत १ हजार ९७८ घरांची आणि २ हजार १७६ (घरातील आणि घराबाहेरील) पाण्याच्या टाक्यांची तपासणी करण्यात आली. टाकलेल्या रंगाच्या एका डब्यात मलेरियाचे डास आढळून आले. तर, एका ठिकाणी ताडपत्री व पिंपात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती दिसून आली. २७ ठिकाणीचे अडगळीचे साहित्य, १० टायर्स आणि ६ ताडपत्र्या काढून टाकण्यात आल्या.
माउंट मेरीच्या जत्रेत जनजागृती
वांद्रे येथे माउंट मेरीची जत्रा सुरू आहे. या जत्रेतदेखील महापालिकेने डेंग्यू आणि मलेरिया रोखण्यासाठी जनजागृती केली आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती कुठे होते, मलेरियाच्या डासांची उत्पत्ती कुठे होते, डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी काय करावे, याविषयी हजारहून अधिक व्यक्तींना माहिती देण्यात आली.
कुठे होते डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती? : डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. सलग सात दिवस स्वच्छ पाणी साठून राहिल्यास उदा. झाडांखाली ठेवण्यात येणाऱ्या ताटल्या, मनी प्लॅण्ट, फेंगशुई प्लॅण्ट, एसीतून पडणारे पाणी, फ्रीजमध्ये साठणारे पाणी या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते.