Join us

डेंग्यूचा आकडा ७०३, तुमच्या भागात यातले किती? हिवतापही जोडीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 9:50 AM

अधूनमधून पडणारा पाऊस, वाढता उकाडा अशा सतत बदलत्या वातावरणामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचत आहे.

मुंबई : कमी-जास्त प्रमाणातील पाऊस, ढगाळ हवामान यामुळे सप्टेंबरमध्ये हिवताप व डेंग्यूच्या डासांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. परिणामी मागील आठवड्यात मुंबईत हिवताप आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जून, जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत.

अधूनमधून पडणारा पाऊस, वाढता उकाडा अशा सतत बदलत्या वातावरणामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचत आहे. त्यामुळे डेंग्यू आणि हिवतापला कारणीभूत असलेल्या एडीस आणि ॲनोफेलिस या डासांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. परिणामी मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून डेंग्यू आणि हिवताप रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसते आहे. 

१८ सप्टेंबरला हिवतापचे ७५६ तर डेंग्यूचे ७०३ रुग्ण सापडले आहेत. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमधील रुग्णांची संख्या अधिक आहे. हिवतापचे जूनमध्ये ६७६, जुलैमध्ये ७२१, ऑगस्टमध्ये १०८० रुग्ण सापडले. तसेच डेंग्यूचे जूनमध्ये ३५३, जुलैमध्ये ६८५, ऑगस्टमध्ये ९९९ रुग्ण सापडले होते. लेप्टो, हेपेटायटिस, चिकुनगुनिया यांची संख्या कमी झाली.

 गॅस्ट्रोसाठी काळजी घ्या  तीन महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली असली तरी १८ सप्टेंबरपर्यंत ३२२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे गॅस्ट्रोचा धोका कमी हाेत असला तरी काळजी घेण्याची घ्या.

पावसाळी आजार नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. घरोघरी जाऊन ४९ लाख ७८ हजार ७५० घरांचे सर्वेक्षण केले. त्यातून ८३ हजार ३४२ व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले. तर २३ कार्यालयांच्या ठिकाणी जाऊन सर्वेक्षण केले. मलेरिया वाढीसाठी कारणीभूत असलेल्या ॲनोफेलिस डासाच्या उत्पत्तीची १२७० तर एडीस डासाच्या उत्पत्तीची ९९७६ ठिकाणे नष्ट करण्यात आली.

टॅग्स :डेंग्यू