दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव बामणे कोंड येथील रहिवासी महिलेला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही महिला कामानिमित्ताने गेली सहा महिने मुंबई उपनगरातील दहिसर येथे राहत आहे. मुंबईहून महाडला आल्यानंतर तिला ताप आल्याने दासगाव येथील एका दवाखान्यात तपासणी केली असता डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दीपाली दीपक पवार (३८) असे या महिलेचे नाव आहे.पवार या सध्या दहिसर येथे वास्तव्यास असून महाड तालुक्यातील दासगाव येथे एका नातेवाइकाकडे आल्या होत्या. गेल्या पाच दिवसांपासून त्यांना ताप येत होता. दासगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. ताप जात नसल्याने रक्ताची तपासणी केली असता, महिलेला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर महाड येथे उपचार सुरु होते. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. (वार्ताहर)
दासगावमध्ये आढळला डेंग्यूचा रूग्ण
By admin | Published: November 17, 2014 10:34 PM