तलासरीत आढळले डेंग्यूचे रुग्ण
By Admin | Published: November 5, 2014 12:07 AM2014-11-05T00:07:09+5:302014-11-05T00:07:09+5:30
तालुक्यात डेंग्यूचे १० संशयित रुग्ण आढळून आल्याने तालुका आरोग्य विभागाने डेंग्यू रुग्ण सर्वेक्षणाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
तलासरी : तालुक्यात डेंग्यूचे १० संशयित रुग्ण आढळून आल्याने तालुका आरोग्य विभागाने डेंग्यू रुग्ण सर्वेक्षणाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत आरोग्य विभागाने तालुक्यातील १५,८६७ घरांची तपासणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र, उधवा प्राथमिक आरोग्य केंद्र, आमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र, वसा प्राथमिक आरोग्य केंद्र या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबर तालुक्यातील १० उपकेंद्रांच्या माध्यमातून तालुक्यात व्यापक डेंग्यू सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. ३१ आॅक्टोबरपर्यंत या मोहिमेंतर्गत तापाचे एकूण २०४ रुग्ण आढळून आले.
तलासरी तालुक्यातील घराघरांमधील ११,९०१ कंटेनरची तपासणी करण्यात आली. यामध्ये दूषित पाणी आढळून आलेले कंटेनर खाली करून साफ करण्यात आले, तर उर्वरित कंटेनरमध्ये जंतुनाशके टाकण्यात आली. या तपासणी मोहिमेमध्ये खाजगी रुग्णालयामध्ये उपचार होत असलेल्या १० रुग्णांपैकी ८ रुग्णांची प्रकृती बरी असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तलासरीत संशयित रुग्ण आढळून आल्याने तलासरी ग्रामपंचायतीबरोबर इतर ग्रामपंचायतींनीदेखील स्वच्छता मोहीम हाती घेतली असून औषध फवारणी करीत आहेत.
तलासरी तालुक्यात संशयित डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचा फायदा मात्र, खाजगी रुग्णालयाने घेतला असून डेंग्यूच्या टेस्टवर रुग्णाला घाबरवून त्यांच्यावर महागडे उपचार केले जात असल्याने आदिवासी रुग्णांची मात्र लूट होत असल्याच्या प्रतिक्रया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
संशयित डेंग्यू रुग्णांची माहिती घेतली असता यामध्ये जास्त प्रमाणात रुग्ण बाहेरगावी कामानिमित्त जात असल्याचे आढळून आले.
(वार्ताहर)