डेंग्यूचा डोक्याला ताप! रुग्ण संख्येत वाढ
By संतोष आंधळे | Published: September 26, 2023 09:23 PM2023-09-26T21:23:42+5:302023-09-26T21:24:02+5:30
ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५ तर सप्टेंबरमध्ये या आजराचे रुग्ण ९९९ झाले आहेत.
मुंबई : पावसाळी आजराच्या रुग्ण संख्या कमी होत असली तरी डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळी आजराच्या रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये गेल्या महिन्याच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे रुग्ण ६८५ तर सप्टेंबरमध्ये या आजराचे रुग्ण ९९९ झाले आहेत.
गेल्या काही दिवसात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र डासांपासून होणारे आजार मात्र या काळात पाहायला मिळत आहे. यामध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या आजराचे रुग्ण अधिक आहेत. हेपेटायटिस आणि गॅस्ट्रोची रुग्णसंख्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत स्वाईन फ्लूचे रुग्ण या महिन्यात कमी प्रमाणात आढळून आले आहे.
डेंग्यू हा डासांच्या माध्यमातून होणारा विषाणूजन्य आजार आहे.एडिस इजिप्ती या प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत ठरत असतात. या आजरात तापामुळे काही जणांना हाडं आणि स्नायूत खूप वेदना जाणवत असतात. त्यासोबत डोकेदुखी, मळमळ, अंगावर लाल पुरळ येणं, अशी लक्षणं दिसू शकतात.
या आजरात रुग्णाला त्याची लक्षणे पाहून औषधं दिली जातात. जर रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
पावसाळी आजार रुग्ण संख्या
मलेरिया
ऑगस्ट - १०८०
सप्टेंबर - १०६८
लेप्टो
ऑगस्ट - ३०१
सप्टेंबर - ६१
डेंग्यू
ऑगस्ट - ६८५
सप्टेंबर - ९९९
गॅस्ट्रो
ऑगस्ट - ९७८
सप्टेंबर - ४४०
हेपेटायटिस
ऑगस्ट - १०३
सप्टेंबर - ४८
चिकुनगुनिया
ऑगस्ट - ३५
सप्टेंबर - २४
स्वाईन फ्लू
ऑगस्ट - ११६
सप्टेंबर - १२