Join us  

डेंग्यूचा डंख! वर्षभरात राज्यात ५५ जणांचा मृत्यू; आर्थिक पाहणीत आरोग्याची स्थिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 6:23 AM

पावसासोबत कीटकजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिसून आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसासोबत कीटकजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढत असल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दिसून आले आहे. २०२३-२४ आर्थिक वर्षात डेंग्यू आजारामुळे ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर हिवतापामुळे १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२-२३ च्या तुलनेत हे बळी जास्त असल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून दिसते. पावसाळ्यात डासांमुळे पसरणाऱ्या डेंग्यूमुळे रुग्णांना सांधेदुखीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. डेंग्यू रुग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञ रुग्णांच्या प्लेटलेट्सवर लक्ष ठेवून असतात. प्लेटलेट्सची संख्या खूपच कमी झाल्यास शरीरातील विविध अवयवांवर परिणाम दिसून येतो. 

काही वेळा हा आजार गंभीर झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसात पाणी होते. एडिस इजिप्ती या मादी डासाच्या चाव्यामुळे हा आजार होतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. गेल्यावर्षी १९ हजार ६११ नागरिकांना  डेंग्यूची लागण झाली, त्यात ५५ रुग्णांचा मृत्यू झाला. हेच प्रमाण २०२२-२३ मध्ये जवळपास निम्म्यावर होते. त्यावेळी ८ हजार ८२२ रुग्णांना हा आजार होऊन २७ जणांचा मृत्यू झाला होता.  

टॅग्स :मुंबईडेंग्यू