जयंत धुळप, अलिबागसंपूर्ण राज्यात थैमान घालणा-या डेंगीची लागण रायगड जिल्ह्यातही झाली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते आॅक्टोबर २०१४ या १० महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात डेंगीचे ३८१ संशयित रुग्ण निष्पन्न झाले. डेंगीची खातरजामा करण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपचारांमध्ये एकूण ३५ रुग्णांच्या चाचण्या सकारात्मक निष्पन्न झाल्या. त्यांच्यावर जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार करुन डेंगीमुक्त करण्यात आले. दरम्यान एप्रिल २०१४ मध्ये अलिबाग तालुक्यांतील सागांव येथील यशवंत भगत यांचा डेंगीमुळे मृत्यू झाला आहे.डेंगीचा सर्वाधिक प्रादुर्भाव ज्या ठिकाणी इमारत बांधकामे सुरु आहेत, अशा ठिकाणी झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील एकूण ३८१ डेंगी संशयित रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण या बांधकामांवरील परप्रांतीय मजूर असल्याचे निष्पन्न झाले आहे. रायगड जिल्हा रुग्णालयात दाखल ३८ डेंगी ईलायझा सकारात्मक रुग्णांमध्ये चार रुग्ण अलिबाग शहर परिसरातील होते तर उर्वरित ३४ रुग्ण हे बांधकामांवरील परप्रांतीय मजूर होते. ग्रामीण भागात गाव, वाडी, वस्तीवर सध्या डेंगीचे रु ग्ण आढळून आले आहे. डेंगी ताप (हाडमोडी ताप) हा आजार विशिष्ट विषाणूंमुळे होतो. डेंगीचा प्रसार ‘एडीस एजिप्टाय’ नावाच्या डासापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठविलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. प्रामुख्याने प्लास्टिकच्या बादल्या, नारळाच्या करवंट्या, घरातील शोभेच्या कुंड्या, फुलदाण्या, निरुपयोगी टायर्स आदी ठिकाणी डासांची उत्पत्ती होते.
डेंगीच्या रुग्णांत वाढ
By admin | Published: November 06, 2014 11:05 PM