नवी मुंबई : डेंग्यू संशयित ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोपरखैरणे गाव येथे राहणाऱ्या या मुलावर वाशीतील फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.संजोग पाटील (११) असे या मयत मुलाचे नाव आहे. शुक्रवारी त्याला रात्री वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तापामुळे त्याची प्रकृती खालावत चालली होती. तपासणीत त्याच्या प्लेटलेट्स देखील ३० हजारांहून कमी झाल्याचे समजले. त्यामुळे संजोग याला डेंग्यू झाल्याची शक्यता होती, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी सांगितले. त्यामुळे संजोग याच्यावर दक्षता विभागात उपचार सुरू होते. या दरम्यान शनिवारी त्याची प्रकृती अधिक खालावली असता तत्काळ फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फोर्टीस रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. या उपचारादरम्यान रविवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. नवी मुंबईत सध्या तापाची साथ पसरली आहे. शहरात दिवसागणीक तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यापैकी अनेक रुग्णांना डेंग्यू, मलेरियाची लागण झाल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यू संशयित रुग्णाचा अखेर मृत्यू
By admin | Published: November 18, 2014 1:48 AM