भूखंडाचा ताबा देण्यास नकार
By Admin | Published: July 1, 2015 11:19 PM2015-07-01T23:19:38+5:302015-07-01T23:19:38+5:30
तारापूर एमआयडीसीमध्ये बॉम्बे रेयॉनने उद्योग उभारणीसाठी २०१० मध्ये प्लॉट घेऊनही तेथे उत्पादन सुरू न केल्याच्या कारणावरून हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या
बोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये बॉम्बे रेयॉनने उद्योग उभारणीसाठी २०१० मध्ये प्लॉट घेऊनही तेथे उत्पादन सुरू न केल्याच्या कारणावरून हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. त्यामुळे अखेर पंचनामा नोटीस गेटवर लावून अधिकाऱ्यांना परतावे लागले. मात्र, सरकारी कामात अडथळा तसेच शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून एमआयडीसीच्या वतीने बोईसर पोलिसांत दोघांवर एफआयआर दाखल केला आहे. मात्र, व्यवस्थापनाने शिवीगाळीचा इन्कार करून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.
तारापूर एमआयडीसी क्षेत्रातील प्लॉट नं. डी - ८ (७५ एकर) तर प्लॉट नं. एफ - ९, (पावणेचार एकर) हे दोन प्लॉट २३ डिसेंबर २०१० रोजी घेतले, परंतु मर्यादित मुदतीच्या वेळेत तेथे उत्पादन प्रक्रिया सुरू न केल्याच्या कारणावरून एमआयडीसीने २७ एप्रिल, २७ मे, अंतिम नोटीस १५ जून २०१५ अशा तीन वेळा लीज टर्मिनेशनसाठी या उद्योगाला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बॉम्बे रेयॉनच्या व्यवस्थापनाने नोटिसांना उत्तरही दिले होते. परंतु, ते फेटाळून एमआयडीसी प्रशासनाने दोन्ही भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली.
२९ जूनला दुपारी एमआयडीसी ठाणे-१ च्या प्रादेशिक अधिकारी शारदा पवार, क्षेत्र व्यवस्थापक पी.बी. करते, सहायक क्षेत्र व्यवस्थापक के.बी. पाटील, सर्व्हेअर गरूड, एमआयडीसी तारापूर विभागाचे उपअभियंता पाटील, सहायक अभियंता एस.ए. कुंभार व एस.बी. उबाळे इ. अधिकाऱ्यांचे पथक भूखंडाचा ताबा घेण्यासाठी गेले असता व्यवस्थापनाचे प्रतिनिधी निलेश कुलकर्णी यांनी या प्रकरणासंदर्भात ठाणे येथील न्यायालयात दाद मागण्यात आल्याचे पथकाला सांगितले. तेव्हाच जोरदार प्रतिकारही करण्यात आल्याने अखेर हतबल होऊन एमआयडीसीच्या पथकाला गेटवर नोटीस लावून परतावे लागले. यासंदर्भात कंपनीचे प्रतिनिधी निलेश कुलकर्णी व अन्य एकावर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल बोईसर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याबाबतीत तारापूर एमआयडीसीचे उपअभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तुम्ही क्षेत्र व्यवस्थापकांशी बोला, असे सांगितले. मात्र, क्षेत्र व्यवस्थापक पी.बी. काटे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधूनही प्रतिसाद दिला नाही, तर उपअभियंता पाटील यांनी संबंधित भूखंडावरील वीज व पाणीपुरवठा बंद करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. (वार्ताहर)
एमआयडीसीच्या नोटीसीला उत्तरही देण्यात आले असून सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने कारवाई कायद्याला अनुसरून नाही तसेच पथकाला शिवीगाळही केलेली नाही.
- निलेश कुलकर्णी,
व्यवस्थापन प्रतिनिधी
सरकारी कामात अडथळा व शिवीगाळ केल्याची तक्रार एमआयडीसी कडून प्राप्त झाली असून एन. सी. दाखल करण्यात आली आहे.
- के. एस. हेगाजे,
पोलीस निरिक्षक