Join us

‘संत बंता’ चित्रपट प्रदर्शनाच्या स्थगितीस नकार

By admin | Published: April 19, 2016 4:01 AM

‘संता बंता’ चित्रपट प्रदर्शनास अंतरिम स्थगिती देण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. या चित्रपटामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

मुंबई : ‘संता बंता’ चित्रपट प्रदर्शनास अंतरिम स्थगिती देण्यास सोमवारी उच्च न्यायालयाने नकार दिला. या चित्रपटामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच शीख समाजाची प्रतिमा खराब करण्यात आली आहे, असे पंजाबी कल्चरल हेरीटेज बोर्डचे (पीसीएचबी) अध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी याचिकेत म्हटले आहे.‘संता बंता’ चित्रपट प्रदर्शनास अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती सप्रा यांनी याचिकेत केली आहे. मात्र न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. शालिनी फणसाळकर - जोशी यांच्या खंडपीठाने चित्रपट प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार दिला. ‘जोपर्यंत निर्माते आणि सेन्सॉर बोर्डाची बाजू ऐकण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देणार नाही,’ असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला. तर प्रतिवाद्यांना दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले.याचिकेनुसार, या चित्रपटामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. हा चित्रपट असभ्य असून दोनअर्थी वाक्ये वापरण्यात आली आहेत. यामुळे शीख समाजाची प्रतिष्ठा मलिन होईल. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.‘चित्रपटातील पात्रांचे असभ्य वर्तन सहन केले जाऊ शकत नाही. तसेच चित्रपटातील संवादही दोन अर्थाचे असल्याने चित्रपट प्रदर्शनास स्थगिती द्यावी,’ अशी मागणी याचिकाकर्त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील बी. आर. देसाई यांनी खंडपीठाकडे केली. चित्रपटात ‘सरदारजी’ वर करण्यात आलेले जोक असभ्य आहेत. ते सहन करण्यासारखे नाहीत. शीख समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)