मुंबईत होणार दाट घनतेचे जंगल; पर्यावरणाचा राखणार समतोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:57 AM2020-03-14T00:57:10+5:302020-03-14T00:58:15+5:30
महापालिकेचे उद्दिष्ट; पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व पर्यावरण सुसंगतता साधली जावी, यासाठी १०० ठिकाणी मियावाकी पद्धतीची शहरी वने विकसित करण्याचे उद्यान विभागाचे नियोजन आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण दिवसागणिक वाढत असून, येथील विविध प्रकल्पांसाठी हरित आच्छादन नष्ट होत आहे. परिणामी, पर्यावरणाचा प्रश्न आणखीच गंभीर बनला आहे. त्यामुळे भविष्यात येथील जंगल वाढावे म्हणून मुंबई महापालिका सरसावली आहे. आणि यासाठी मुंबईत ग्रीन लंग्स - उच्च घनतेचे वन तयार करण्याच्या उद्दिष्टाने मोहीम राबवली जात आहे.
मुंबईत ग्रीन लंग्स - उच्च घनतेचे वन तयार करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात शनिवारी सकाळी १० वाजता मियावाकी वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे वाढलेले प्रमाण कमी करून आॅक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिका मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात मियावाकी पद्धतीच्या वृक्षलागवडीवर भर देत आहे. शिवाय सांघिक पर्यावरणीय जबाबदारीअंतर्गत मुलुंड-पवई येथे मियावाकी पद्धतीने शहरी वनीकरण करण्यात येणार आहे.
झाड वाढण्यास लागतो कमी कालावधी
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व पर्यावरण सुसंगतता साधली जावी, यासाठी १०० ठिकाणी मियावाकी पद्धतीची शहरी वने विकसित करण्याचे उद्यान विभागाचे नियोजन आहे. मियावाकी पद्धतीने विकसित करण्यात येत असलेल्या वनांमधील झाडे ही अधिक वेगाने वाढतात.
सामान्य पद्धतीने लावलेले झाड वाढण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा साधारणपणे निम्म्यापेक्षा कमी कालावधीत तेवढ्याच उंचीचे झाड वाढते. मियावाकी झाडांमधील अंतर हे कमी असल्याने ती घनदाट असतात.