डेन्टिस्ट पतीला कारावास
By admin | Published: November 6, 2015 03:01 AM2015-11-06T03:01:49+5:302015-11-06T03:01:49+5:30
आजच्याही काळात हुंड्यासाठी पत्नीची हत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे, अशी खंत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने डेन्टिस्ट व त्याच्या
मुंबई : आजच्याही काळात हुंड्यासाठी पत्नीची हत्या करण्याचे प्रमाण अधिक आहे, अशी खंत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने डेन्टिस्ट व त्याच्या आई-वडिलांना सुनेच्या हत्येप्रकरणी सात वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच ४५ हजार रुपये दंडही ठोठावला.
मुलासाठी सुरू केलेले रुग्णालयाचे काम सासऱ्याने पूर्ण करावे, अशी हाव या कुटुंबाला होती. ती पूर्ण करणे, हाच त्यांचा उद्देश होता. आपल्या देशात विवाह संस्थेचा असा अर्थ होत नाही. आजच्या काळातही असे प्रकार वारंवार घडत आहेत, असे म्हणत न्या. इंदिरा जैन आणि अरुण चौधरी यांच्या खंडपीठाने पीडितेच्या वडिलांचे अपील दाखल करून घेतले होते.
रुग्णालय बांधण्यासाठी सुचिता पुरेसे पैसे माहेरच्यांकडून आणत नसल्याने तिच्या सासू-सासऱ्यांनी आणि डेन्टिस्ट असलेल्या पतीने तिला पेटवून तिची हत्या केली. खंडपीठाने पती व सासू-सासऱ्यांना याप्रकरणी दोषी ठरवत सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला. तर सुचिताशी क्रूरपणे वागल्याप्रकरणी आणखी दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड खंडपीठाने ठोठावला. या तिघांना तातडीने अटक करण्याचा आदेशही खंडपीठाने दिला.
सुचिताचे पती नितीन पाटील (२५) आणि त्याचे वडील बाबूराव (६७) आणि आई शारदा (६५) यांची सत्र न्यायालयाने १ जून २०१५ रोजी निर्दोष सुटका केली होती. सत्र न्यायालयाचा हा निर्णय रद्द करताना खंडपीठाने म्हटले की, उच्चशिक्षित पतीकडून कमीत कमी सभ्यतेची अपेक्षा आहे.
पीडितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबानीनुसार, सुचिताचा विवाह २००८ मध्ये नितीनशी झाला. सुरुवातीचे एक वर्ष सुरळीत पार पडले. मात्र त्यानंतर नितीनचे रुग्णालय पूर्ण करण्यासाठी सुचिताला माहेरून पैसे आणण्याचा तगादा सासरच्यांकडून सुरू झाला. पीडितेच्या वडिलांनी १२ लाख रुपये दिले. तरीही त्यांनी सुचिताला वडिलांकडे आणखी पैसे मागण्यास सांगितले. मात्र ती मागणी पूर्ण न करू शकल्याने नितीन व त्याच्या आई-वडिलांनी तिला पेटवून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला.