‘समुद्राच्या लाटेपासून वीजनिर्मितीचा पर्याय ऊर्जा विभागाने पडताळावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:48 AM2020-01-08T05:48:03+5:302020-01-08T05:48:06+5:30
मागणीप्रमाणे किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून द्या.
मुंबई : मागणीप्रमाणे किफायतशीर दरात वीज उपलब्ध करून द्या. सर्व ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय व्हावे, अशा सूचना देताना समुद्राच्या लाटेपासूनही वीजनिर्मितीचा पर्याय ऊर्जा विभागाने पडताळून पाहावा, असे आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले.
फोर्ट येथील महावितरणच्या सांघिक कार्यालयात नितीन राऊत यांनी मंगळवारी महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. ग्राहकांचा विजेवरील होणारा खर्च कमी करण्यासाठी वीजनिर्मितीचा खर्च कमी करावा. विदर्भ व मराठवाड्यात सौरऊर्जेची चांगली क्षमता आहे. त्याचा पुरेपूर करत सर्व शासकीय इमारतींवर सौरऊर्जा संयंत्र स्थापन करावे, असे राऊत यांनी सांगितले.